तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. डावाची सुरूवात ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी केली. मात्र पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर ईशान फक्त १ धाव करून बाद झाला. ईशानच्या जागी आलेल्या राहुल त्रिपाठीने पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्यास सुरुवात केली. राहुल मोठी खेळी करेल असे वाटत असताना सहाव्या षटकात तो बाद झाला. त्याने १६ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांसह ३५ धावा केल्या.
राहुल बाद झाला तेव्हा भारताने अर्धशतक पूर्ण केले होते. त्याच्या जागी फलंदाजीला आला. सूर्यकुमारने फलंदाजी सुरु केल्यावर श्रीलंकेच्या गोलंदाजांना त्यांची चूक लक्षात आली. राहुल त्रिपाठी बरा पण सूर्यकुमार नको अशी त्यांची अवस्था झाली. सूर्यकुमारने लंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने फक्त २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
सूर्याचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर शुभमन गिल जो अर्धशतकाच्या जवळ आला होता तो ४६ धावांवर बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारले. त्यापाठोपाठ कर्णधार हार्दिक पंड्या ४ आणि दीपक हुड्डा ४ धावांवर झटपट बाद झाले. एका बाजूला विकेट पडत असताना सूर्यावर मात्र त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. त्याने चेंडू मैदानाबाहेर पाठवण्याचे थांबवले नाही.
१९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सूर्यकुमारने ४५ चेंडूत टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक पूर्ण केले. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना टी-२० मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले. या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर असून त्याने श्रीलंकेविरुद्ध २०१७ साली इंदूर मैदानावर ३५ चेंडूत शतक पूर्ण केले होते.