टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजीकरत लंकेला २२९ धावांचे अवघड असे आव्हान दिले होते. श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली होती. मात्र ५०च्या आत त्यांना दोन झटके बसले. ४४ धावांवर अक्षर पटेलने पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्शदीपने सहाव्या ओव्हरमध्ये लंकेला दुसरा धक्का दिला. तर ५१ धावसंख्येवर हार्दिक पंड्याने श्रीलंकेची तिसरी विकेट घेतली. लंकेची अवस्था ३ बाद ५१ अशी झाली होती.
धनंजया डी सिल्वा आणि चारिथ असलंका हे डाव संभाळून घेतील असे वाटत असताना युजवेंद्र चहलने या दोघांना माघारी पाठवले. १२व्या षटकात लंकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारताची पकड मजबूत होती. पण मैदानावर लंकेचा कर्णधार दसुन शनाका होता. दसुन एक हाती सामना जिंकून देऊ शकतो याची भारतीय गोलंदाजांना कल्पना होती. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूने विकेट घेण्यास सुरुवात केली आणि तेथेच लंकेचा पराभव निश्चित झाला. श्रीलंकेचा डाव १६.४ षटकात १३७ धावांवर संपुष्ठात आला.
भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक ३, हार्दिक पंड्या, उमरान मलिक, चहल यांनी प्रत्येकी २ तर अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.