Gadchiroli: शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या सुरजागडवरील ‘ठाकूर देवा’ची जत्रा 4 जानेवारी पासून सुरू झाली. दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात जत्रा भरवण्याची परंपरा कायम आहे. 4 ते 7 जानेवारी असे चार दिवस ही जत्रा चालणार आहे. जत्रेच्या तिसऱ्या दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढते. कारण आदिवासींचे दैवत ‘ठाकूर देवा’चे पूजन तिसऱ्याच दिवशी केले जाते. तब्बल सात किलोमीटर डोंगर दऱ्या ओलांडून जीव धोक्यात टाकून गड चढाई करून पूजापाठ केली जाते. खडतर प्रवासानंतर इथे ‘ठाकूर देवा’चे दर्शन मिळते. जत्रेत पहिल्या दिवशी भाविकांचे आगमन व बिंदिया पूजा दुसऱ्या दिवशी घटस्थापना व सांस्कृतिक कार्यक्रम तिसऱ्या दिवशी गड चढाई व महापूजा तसेच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन चौथ्या दिवशी इलाखा ग्रामसभा मार्गदर्शन आणि समारोप असे जत्रेचे स्वरूप असते. मुख्य म्हणजे तिसर्‍या आणि चौथ्या दिवशीच भाविकांची गर्दी वाढते. ठाकूर देवाची पूजा करण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून सुद्धा भाविक येथे येत असतात. सुरजागड हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर आलापल्लीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. तर परभणी जिल्हा मुख्यालयापासून ठिकाण 145 किलोमीटरवर आहे.

ठाकूर देव जत्रेत दरवर्षीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भाविक मोठ्या उत्साहाने या जत्रेत येत असतात. मात्र, बरेच जण डोंगराच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या ठाकूर देव मंदिरात पोहोचू शकत नाही. येथे जायला रस्ता नसल्याने जीव धोक्यात टाकून खडतर प्रवास करावा लागतो. त्यामुळे काहीजण खाली असलेल्या मंदिरातच पूजा करून दर्शन घेतात. परंतु ज्यांची श्रद्धा आहे, जे दरवर्षीच गडावर चढतात असे भाविक अथक परिश्रम घेऊन गडावरील ठाकूर देवाचे दर्शन घेत असतात. सात किलोमीटर अंतर कापून डोंगरावर चढून पूजा करून परत सात किलोमीटर खाली उतरावं लागतं. मात्र, पूजेच्या दिवशी भाविकांना अजिबात त्रास जाणवत नसल्याचे भाविक सांगतात हे विशेष.

सुरजागड गावालगत काही अंतरावर ही जत्रा भरत असलेतरी घनदाट जंगलाने व्यापलेला हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पोलिसांची करडी नजर असते. जत्रेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध तुकड्या या परिसरात तैनात करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर सिविक ॲक्शनच्या माध्यमातून सदर जत्रेत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात विविध खेळांचा सुद्धा समावेश आहे.

जल, जंगल, जमिनीच्या संरक्षणासाठी आदिवासी करतात प्रार्थना

सुरजागडावर असलेल्या मंदिरात बळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे भाविक बकरी आणि कोंबड्यांचा बळी देतात. आदिवासी वाद्य वाजवत व नृत्य करीत पूजा करतात. ग्रामसभेकडून असा कायदा वन कायदा याबद्दल मार्गदर्शन करून जल, जंगल, जमीन त्याचे संरक्षण करणे याबद्दल जागृती केली जाते.

live reels News Reels

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here