राज्यासह देशात करोनानं थैमान घातलं आहे. करोनाला अटकाव घालण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आता मात्र अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, असं असलं तरी करोनाचा प्रादुर्भाव काही थांबलेला नाहीये. नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी बजावण्यात येतं. पण सरकारच्या या नियामांना वेळोवेळी नागरिकांकडून हरताळ फासण्यात येतो. नागपुरातही करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासा बेजाबदारपणे वागणारे नागरिकच कारणीभूत आहेत. जर नियमांचे पालन होणार नसेल तर पुन्हा लॉकडाऊनसोबतच कडक संचारबंदी लागू करण्यात येईल. दोन-तीन दिवस परिस्थितीचे निरीक्षण करून त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
नागपुरात लॉकडाऊन की संचारबंदी? यासंदर्भात महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेसबुकवरून संवाद साधला. काही नागरिकांमुळं १०० टक्के नियमांचे पालन होत नसल्यानं करोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असंच जर नियमांचे उल्लंघन होत नसेल तर परिस्थिती कशी नियंत्रणात येईल असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळं बाजारात सोशल डिस्टनसिंग व मास्कचा वापर बंधनकारक आहे. सोबतच आपल्या जीवनशैलीत बदल करा जेणेकरुन कोरोनाचा फैलाव थांबवता येईल. शिवाय, गरज नसतांना घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, एका दुचाकीवर दोन तीन व्यक्ती बसणे. हे थांबणे अत्यंत गरजेचे असल्याचं मुंढेनी सांगितलं.
दरम्यान, करोनाच्या या संकटातून वाचण्यासाठी नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक जालीम उपाय सूचवला आहे. समोरचा प्रत्येक व्यक्ती हा करोनाबाधित आहे, असं समजून स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही आपोआप करोनापासून वाचाल, असा आरोग्यमंत्रच तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times