मुंबई : बँक खाते तसेच इतर खाते सुरू ठेवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे. आता घरातूनही केवायसी अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशाच संधीचा गैरफायदा घेत ऑनलाइन केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी या टोळीतील तिघांची नवी दिल्ली आणि झारखंड येथून ताब्यात घेतले असून त्यांनी अनेकांना फसवल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
माटुंगा येथे वास्तव्यास असलेले ६४ वर्षीय वसंत छेडा यांच्या मोबाइलवर एक संदेश आला. बँक कर्मचारी असल्याचे भासवून पाठविलेल्या या संदेशात तुमच्या खात्याची केवायसी अपडेट नाही. केवायसी अपडेट न केल्यास बँक खाते बंद होईल, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे छेडा यांनी या क्रमांकावर संपर्क केला असता त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाइन पद्धतीने केवायसी अपडेट करता येईल, असे कथित बँक कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानुसार छेडा यांना बोलण्यात गुंतवून बँक खात्याचा तपशील आणि ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यामधून एक लाख नऊ हजार रुपये काढले. छेडा यांनी तक्रार केल्यानंतर माटुंगा पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर मोबाइल क्रमांक आणि फसवणुकीसाठी वापरलेली बँक खाती याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. दिल्ली येथील एका दुकानातून याच खात्यांचा वापर करून मोबाइल खरेदी करण्यात आल्याचे दिसले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या तरुणांनी सहा ते सात मोबाइलची याआधी खरेदी केल्याचे दिसले. त्यानुसार मोबाइलची डिलिव्हरी घेण्यास आले असता पोलिसांनी सैफ अली आणि कलाम अन्सारी यांना अटक केली तर त्यांचा साथीदार अरुणकुमार मंडल याला झारखंड येथून पकडण्यात आले. या तिघांचा आतापर्यंत आठ ते दहा गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.