Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीत पडणार असल्याच्या संजय राऊत यांच्या दाव्याविषयीही शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, याबाबत मला काही माहिती नाही. आता मी मुंबईला गेल्यावर संजय राऊत यांच्याशी बोलेल आणि जाणून घेईन. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले आहे का, याबाबत मला माहिती नाही, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी केली.

हायलाइट्स:
- सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ यांनी पक्षाचं नेतृत्त्व केले
- विविध समाजातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्त्व केले
- मुळात आमच्या मनात जातीपातीचा विचार येतच नाही
राज ठाकरे यांच्या टीकेचा प्रतिवाद करताना शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे नेतृत्त्व कोणत्या नेत्यांकडे होते, हे पाहावे. सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ यांनी पक्षाचं नेतृत्त्व केले. त्यानंतर विविध समाजातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्त्व केले. मुळात आमच्या मनात जातीपातीचा विचार येतच नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडर यांच्या विचारांचे लोक आहोत. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांच्या टीकेची फारशी दखल घेत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. यावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार, हे पाहावे लागेल. राज ठाकरे हे आज पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यावेळी ते शरद पवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देऊ शकतात.
शरद पवार यांचा अमित शाहांना टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुवाहाटी येथे बोलताना नुकतीच एक घोषणा केली होती. १ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण होईल, असे अमित शाह यांनी सांगितले होते. यावरुन शरद पवार यांनी शाह यांना चिमटा काढला. राम मंदिराचे काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. परंतु, ती घोषणा देशाच्या गृहमंत्र्यांनी केली. सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच अमित शाह यांनी ही घोषणा केल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.
राज्यपालांवर आम्ही पण सगळे नाखूश: शरद पवार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इथे नाखूशअसतील तर आम्ही पण सगळे त्यांच्याबद्दल नाखूश आहोत. पहिले असे राज्यपाल आहेत की सतत त्यांच्यावर टीका होत आहे. जनता त्यांच्यावर टीका करत आहे. महाराष्ट्राला दर्जेदार राज्यपालांची एक चांगली परंपरा आहे. राज्यात अनेक चांगले राज्यपाल आले. जे जे राज्यपाल महाराष्ट्रात आले पक्ष कोणताही असो पण राज्याच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. त्यांनी संविधानाचे रक्षण केले. मात्र, सध्याचे राज्यपाल हे सातत्याने वादात असतात, त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होते. ते चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यामुळे जनतेला त्यांच्याबद्दलची नापसंती व्यक्त करावी लागते, असे शरद पवार म्हणाले. राज्यपाल हे महत्वाचे पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण ती सध्याच्या राज्यपालांकडून राखली जात नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.