ST Workers Issue: एसटी (ST Bus) कर्मचारी वेतनाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप 7 तारखेला पगार न झाल्यानं महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं (Maharashtra ST Employees Congress) केला आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत, असा थेट आरोपही महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ली जो संप झाला होता. त्या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्ष पूर्ण रक्कम देण्याचे, तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचं न्यायालयानं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं सरकारच्या वतीनं न्यायालयात मान्य केलं होतं. पण गेले सहा महिने सरकारकडून अपुरी रक्कम येत असल्यानं एसटी बँक, भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि इतर मिळून कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी थकली असून सरकार या विषयावर अजिबात गंभीर दिसत नाही. संप काळात बेंबीच्या देठापासून ओरडणारे गेले कुठे? असा सवाल महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. 

“वर्षानुवर्ष दर महिन्याच्या 7 तारीखला वेतन मिळायचं, पण कोरोनामुळे उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे गेली अडीच वर्षे वेतन मागे पुढे झाले आहे. या महिन्यातसुद्धा 7 तारीख रोजी वेतन मिळालेलं नाही. या विषयावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. संप काळात बेंबीच्या देठापासून ओरडत सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे, विलीनीकरण झाले पाहिजे. वेतन वेळेवर मिळाले पाहिजे म्हणणारे आता या विषयावर बोलायला तयार नाहीत. सध्या फक्त नक्त वेतन दिले जातआहे. नक्त वेतनासाठीसुद्धा 210 कोटी रुपये इतकी रक्कम लागते. पण नवे सरकार महिन्याला या पूर्वी 100 कोटी देत होते व गेल्या महिन्यात 200 कोटी रक्कम दिली आहे. या विषयावर कर्मचारी नाराज असून असंतोष पसरला आहे.”, असा आरोप एस.टी.कर्मचारी काँग्रेसचा आहे. 

याशिवाय एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीची 120 कोटी रुपये इतकी रक्कम महामंडळानं बँकेकडे गेले तीन महिने भरणा केलेली नाही. त्यात या महिन्यातसुद्धा सरकारकडून कमी निधी मिळाल्यास वाढ होऊन ही रक्कम 160 कोटींवर जाऊ शकते. याचा फटका बँकेला बसत असून हीच रक्कम बँकेनं व्याजानं गुंतवली असती तर त्यावर अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज बँकेला मिळाले असते. पण ते बुडाले असून त्याची झळ बँकेला सोसावी लागली आहे, असंही ते म्हणाले. 

live reels News Reels

“भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून त्या साठी  वेतनातून कपात केलेल्या रक्कमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केलेला नाही. अंदाजे 650 कोटी रुपये इतकी ही रक्कम असून या महिन्यात पुन्हा सरकारकडून अपुरी रक्कम आल्यास या महिन्यात पुन्हा या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकी नंतर त्या वर मिळणारे अंदाजे पंधरा ते वीस कोटी रुपये इतके व्याज बुडाले असून त्या मुळे ट्रस्टचे  मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.”, असं श्रीरंग बरगे म्हणाले. 

याशिवाय कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था , ग्राहक भांडार, यासुद्धा अडचणीत आल्या आहेत. सर्व  मिळून कोट्यवधी रुपयांची रक्कम थकली आहे. या सर्व प्रकाराला नवे सरकार जबाबदार आहे. कारण पूर्वीच्या सरकारच्या  काळात वेतनाची पूर्ण रक्कम सरकारने दिली होती.कोरोना काळात तर 4000 कोटी इतकी रक्कम सरकारने वेतनासाठी दिली होती. पण नवे सरकार आल्यापासून एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. ही परिस्थिती अशीच पुढे राहण्याची शक्यता दिसत आहे. सरकार न्यायालयात दिलेला शब्द पाळीत नसून कर्मचाऱ्यांची दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोपसुद्धा बरगे यांनी केला आहे. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here