सांगली : मिरज शहरात भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी केलेल्या पाडकामानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. जागेच्या ताब्यावरुन जागेचे मालक आणि वहिवाटदार कब्जेदारांची आज मिरज तहसीलदारांसमोर ११ वाजता सुनावणी होणार आहे. पाडकाम झाल्यानंतर काल काही दुकानदार पाडलेल्या बांधकामाची दुरुस्ती करत जागेवर पुन्हा ताबा घेण्याच्या तयारीत होते. मात्र प्रशासनाने या जागेतील वहिवाट असलेल्या १८ ते २० नागरिकांच्या नावे नोटीस काढत कलम १४५ लावले.

नोटीस घेण्यास नागरिकांनी नकार दिल्याने जागेवर नोटीस चिकटवून आणि पोलीस वाहनांतून उद्घोषणा करून प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान आज या जागेच्या वादाबाबत मिरज तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कोणाच्या बाजूने निकाल दिला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रीतम मुंडेंनी सांगितलं पंकजांचं ‘ताईपण’; ‘पंकजा मुंडेची धाकटी बहीण असणं हे माझं भाग्य’

मिरजमध्ये नेमकं काय घडलं?

शहरातील बस स्टँडजवळील परिसरात ६ जानेवारी रोजी रस्त्याशेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती पाडण्यात आल्या होत्या. मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने दुकानं आणि घरं पाडली. या जागेचा ताबा घेण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर आले होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

गोपीचंद पडळकरांनी काय स्पष्टीकरण दिलं?

ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात बाजू मांडली होती. ‘तोडण्यात आलेले गाळे बेकायदा होते, माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही,’ असं स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलं. मुळात तिथे राहणारेच बेकायदेशीर होते. त्या गरीब लोकांचा या जागेशी कुठलाही संबंध नसताना, त्यांचं नाव नसताना, त्या लोकांना बेघर करायचं नाही म्हणून म्हैसाळ रोडला घर बांधून दिली आहेत, असा दावाही गोपीचंद पडळकरांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here