Mustafa.Attar@timesgroup.comTweet : @mustafaatarMT

पुणे : सौम्य आणि लक्षणेविरहित रुग्णांना ‘होम आयसोलेशन’चा पर्याय देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात ज्यांच्या घरी स्वतंत्र खोलीची व्यवस्था नाही आणि शुल्क भरण्याची तयारी आहे अशा रुग्णांसाठी हॉटेलमध्येच सुरू करण्यात येणार आहे. या विशेष केंद्रांमध्ये कमी दरात आयसोलेशनची सुविधा देण्यात येणार आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) अन्य संघटनांच्या डॉक्टरांनी हॉटेलांमधील कोव्हिड सेंटरमधील रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या शहरात रुग्णांचे प्रमाण वाढत असून, त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या खाटांसह कोव्हिड केअऱ सेंटरची सुविधाही कमी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार सौम्य तसेच लक्षणेविरहित रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय सुचविण्यात आला आहे. अशी लक्षणे असलेल्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यास सांगण्यात आले आहे. अनेक रुग्णांकडे स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येते. त्यामुळे सर्व सेंटर फुल झाल्याचे चित्र आहे.

आयएमए, जनरल प्रॅक्टिशनर्स तसेच अन्य वैद्यकीय संघटनांच्या प्रतिनिधींची महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत हॉटेलांमध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यावर महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना घरात व्यवस्था नसल्यास हॉटेलमधील आयसोलेशनमध्ये पाठविण्यास हिरवा कंदील दाखविला.

‘शहरातील सर्व हॉटेल बंद असून, तेथे सौम्य तसेच लक्षणेविरहित रुग्णांची आयसोलेशनची सशुल्क सोय करता येईल. हॉटेलने संपर्क साधला, तर संबंधित रुग्णांवर नाममात्र शुल्कांत उपचार करण्यात येईल,’ अशी माहिती आयएमएच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी ‘मटा’ला दिली.

आयएमएच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. आरती निमकर म्हणाल्या, विविध भागांतील तीन हॉटेलशी चर्चा सुरू असून, तेथे एक डॉक्टर आणि एक नर्स शिफ्टनुसार उपलब्ध राहतील. दिवसातून एक फिजिशियन जाऊन रुग्णांची तपासणी करील.’

सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करणे शक्य आहे. त्यासाठी हॉटेलमध्ये खाटांची सुविधा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुबी हॉल क्लिनिकने एका हॉटेलमध्ये आय़सोलेशन सुविधा सुरू केली आहे.

डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

रुग्ण वाढत असल्याने कोव्हिड केअर सेंटर कमी पडत आहेत. आमच्या संघटनेच्या वतीने शहरातील ७० ते ८० हॉटेलमध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यासाठीची यादी पालिकेला दिली आहे. आम्ही सशुल्क कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. रुग्णसंख्या वाढल्यानंतर आमच्याकडे त्यांना पाठविण्याची व्यवस्था महापालिका करणार आहे.

गणेश शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल ओनर असोसिएशन

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here