Pune Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार (Maharashtra Kesari ) उद्यापासून पुण्यात रंगणार आहे. 10 ते 14 जानेवारीपर्यंत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

65 व्या महाराष्ट्र केसरीच्या तयारीचा आढावा आणि भव्य मैदानाची पाहणी केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी यंदाच्या स्पर्धेची माहिती दिली. कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. एका कार्डिअॅक अॅम्ब्युलन्ससह चार अॅम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. सह्याद्री आणि जहांगीर हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक आरोग्य व्यवस्था पाहणार आहे.

‘ते’ पत्रक दिशाभूल करणारे

भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीमार्फत ही स्पर्धा अधिकृतपणे घेण्याची जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानवर सोपवली आहे. राज्यातील 45 तालीम संघांचे कुस्तीगीर, पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. असे असतानाही खोडसाळपणे पत्रक काढून विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून, अशा खोडसाळ गोष्टींवर लक्ष देण्याची गरज नाही, असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

live reels News Reels

900 पैलवान भिडणार

राज्यातील 45 तालीम संघातील विविध 18 वजनी गटात सुमारे 900 पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना ‘येजडी जावा’ ही मोटारसायकल आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यानांही बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य आणि अंतिम लढतीची चुरस पाहायला मिळणार आहे. समारोपाच्या दिवशी शनिवारी (दि. 14) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघांचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर यापूर्वीचे महाराष्ट्र केसरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here