म. टा. विशेष प्रतिनिधी,

करोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. यामध्ये पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गांचा समावेश नव्हता. मात्र, आता ऑनलाइन वर्गांमध्ये याही वर्गांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे लवकरच शिशू वर्ग, नर्सरीचेही भरण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण विभागाने नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाइन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीही सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाची प्रत्येकी दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत. तर पूर्व प्राथमिकच्या म्हणजेच छोटा शिशू व मोठा शिशू तसेच नर्सरीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अर्ध्या तासाचे सत्र ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऑनलाइन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाची प्रत्येकी दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये १५ मिनिटे पालकांशी संवाद आणि १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण देण्यात यावे, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचेही शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घ्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिकमधील विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज अर्धा तास ऑनलाइन वर्ग घेऊन पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करायचे आहे.

तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे तर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ मिनिटांची चार सत्रे ऑनलाइन घ्यावीत, अशा सूचना शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. हा वेळ कमी करण्यात आला आहे. पूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग दोन तास भरायचे ते आता दीड तास भरणार आहेत. तर नववी ते बारावीचे वर्ग चार तासांऐवजी तीन तास भरणार आहेत. ऑनलाइन वर्गाचा कालावधी कमी करावा याबाबत शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

टप्प्याटप्प्याने शाळा सुरू

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करत स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि शाळा समितीवर सोपवण्यात आला होता. याबाबत सरकारने १५ जून रोजीच्या शासन निर्णयात वेळापत्रकही दिले होते. मात्र आता ते वेळापत्रक उपयुक्त ठरणार नाही. असे असले तरी स्थानिक प्रशासनाने तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे या सुधारीत आदेशातही नमूद करण्यात आले आहे.

सर्व बोर्डांच्या शाळांना आदेश द्यावा

राज्य सरकारने यापूर्वीही ऑनलाइन वर्ग कसे घ्यावेत याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र राज्य मंडळ वगळता इतर मंडळाच्या शाळा या सरकारच्या नियमांचे पालन करत नाही. यामुळे ऑनलाइन वर्गासाठी जाहीर केलेल्या सरकारच्या नियमांचे पालन होते की नाही यावर शिक्षण उपसंचालकांना नियंत्रण ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

वेळापत्रक

पूर्व प्राथमिक – सोमवार ते शुक्रवार दररोज अर्धा तास पालक संवाद

पहिली, दुसरी – सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाची प्रत्येकी दोन सत्रे

तिसरी ते आठवी – सोमवार ते शुक्रवार दररोज ४५ मिनिटांची दोन सत्रे

नववी ते बारावी – ४५ मिनिटांची चार सत्रे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here