कोलकाता: कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकला जात असलेल्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना गुटख्याची पाकिटं सापडली. मोठ्या प्रमाणात असलेली पाकिटं पाहून कस्टम अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी पाकिटं उघडण्यास सुरुवात केली. त्यात तब्बल ४० हजार अमेरिकन डॉलर सापडले. अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. कारवाईचा व्हिडीओ विभागाकडून शेअर करण्यात आला आहे.

कस्टम विभागानं केलेल्या कारवाईत ४० हजार अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले. या कारवाईचा व्हिडीओ कस्टम विभागानं शेअर केला आहे. त्यात अधिकारी गुटख्याची पाकिटं उघडताना दिसत आहेत. या पाकिटांमधून अमेरिकन डॉलर बाहेर पडत आहेत. गुटख्याच्या पाकिटांमध्ये अमेरिकन डॉलर निघाल्यानं अधिकारीही चाट पडले.

कस्टम विभागानं ट्विटच्या माध्यमातून कारवाईची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी बँकॉकला जाणाऱ्या एका प्रवाशाला रोखण्यात आलं. त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी गुटख्याची पाकिटं सापडली. पाकिटं उघडल्यानंतर त्यात अमेरिकन डॉलर सापडले. जप्त करण्यात आलेल्या डॉलरचं मूल्य भारतीय रुपयांत ३२ लाखांहून अधिक आहे.

कोलकाता विमानतळाशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटख्याच्या पाकिटांमधून जप्त करण्यात आलेली रक्कम ४० हजार अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. अधिकाऱ्यांनी गुटख्याची पाकिटं उघडण्यास सुरुवात करताच तिथे उपस्थित असलेले अन्य प्रवासी अवाक् झाले. सध्या पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपी एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य आहे का, याचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here