Pune Maharashtra Kesari : 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) फड आजपासून पुण्यात (Pune News) रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. एकिकडे ही स्पर्धा सुरू होत असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेत ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केला आहे. मात्र या स्पर्धेला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता असल्यानं ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच पैलवानांच्या डोपिंगचा मुद्दा चर्चेत आला होता. अशातच आजपासून मानाच्या अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदा मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी काल (सोमवारी) एक पत्रकार परिषद पार पडली. 65 व्या महाराष्ट्र केसरीच्या तयारीचा आढावा आणि भव्य मैदानाची पाहणी केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी यंदाच्या स्पर्धेची माहिती दिली. कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. एका कार्डिअॅक अॅम्ब्युलन्ससह चार अॅम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. सह्याद्री आणि जहांगीर हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक आरोग्य व्यवस्था पाहणार आहे.

live reels News Reels

डोपिंग प्रकरण नेमकं काय? 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधीच कुस्तीच्या आखाड्याला डोपिंगचं ग्रहण लागलंय की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हे प्रकरण चर्चेत आलं ते सोलापुरातून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीमुळे. एकट्या सोलापुरात 8 हजार मेफेन टरमाईनचे इंजेक्शन पैलवानांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलीस भरतीला आलेल्या उमेदवारांनीही मेफेन टरमाईनची इंजेक्शन्स घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान या डोपिंग प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागच्या मास्टरमाईंडला पकडण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर उभं राहिलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here