सोनू सूदने मदतीसाठी केलं ट्वीट
हिमाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका गरिब कुटुंबाला मुलांच्या ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून मोबाइल विकत घ्यायचा होता. पण त्यांच्याकडे स्मार्टफोन विकत घेण्याएवढेही पैसे नव्हते. अखेर त्यांनी घरातली गाय विकली आणि फोन विकत घेतला. ही बातमी सोनूला कळताच त्याने ट्वीट करून त्या व्यक्तीची मदत करण्याचा आश्वासन दिलं. तसंच लोकांना त्या व्यक्तीची माहिती देण्याचीही विनंती केली. ‘चला या व्यक्तीला त्याची गाय परत देऊया.. कोणी मला या व्यक्तीची माहिती देऊ शकतं का..’ असं ट्वीट त्याने यावेळी केलं.
हिमाचल प्रदेशमधलं आहे हे श्रमिक कुटुंब
हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील गुम्मर गावात कुलदीप कुमार यांचं कुटुंब एका लहानशा घरात रहातं. त्यांची मुलगी अनु आणि मुलगा वंश सरकारी शाळेत चौथी आणि दुसरीचं शिक्षण घेत आहेत. महामारीमुळे सध्या सर्वच शाळा बंद असून ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. पण कुमार यांच्याकडे स्मार्टफोन आणि इण्टरनेट नसल्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबलं होतं.
सतत करत आहे लोकांची मदत
आता तो किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या जवळपास तीन हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला. इतकंच नाही तर लॉकडाउनच्या काळामध्ये मरण पावलेल्या तसंच जखमी झालेल्या श्रमिकांच्या कुटुंबांना सोनू आर्थिक आधार देणार आहे. त्यासाठी त्यानं उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. जीव गमावलेल्या स्थलांतरितांचे संबंधित पत्ते आणि बँक तपशील या गोष्टींची माहिती त्यानं अधिकाऱ्यांकडून घेतली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times