Beed: आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून राज्यातील 75 नद्या यांची संवाद यात्रा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वर्धेच्या सेवाग्राम मधून केला. याचाच एक भाग म्हणून मांजरा नदीचे संवाद यात्रा मागच्या आठवड्याभोरा पासून सुरु झाली. बीड जिल्ह्यातील गोवळवाडी येथून मांजरा नदीच्या उगम स्थानापासून सुरू झालेली ही मांजरा संवाद यात्रा आपला आठ दिवसाचा बीड जिल्ह्यातील प्रवास करून आज या प्रवासाची सांगता झाली. उद्या मांजरा नदी संवाद यात्रा ही लातूर जिल्ह्यात पोहोचेल आणि तिथून पुढे कर्नाटक आणि तेलंगणा असा प्रवास करेल.

बिड जिल्ह्यातील चला जाणूया मांजरा नदीला अभियानाचा समारोप अंबाजोगाई तालुक्यातील देवळा या गावी झाला. पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथून निघालेले चला जाणूया नदीला अभियान पुढे लातूर जिल्ह्यात जाणार आहे. देवळा येथे बिड जिल्ह्यातील अभीयानाचा समारोप चला जाणूया नदीला अभियानाचे राज्य समिती सदस्य अनिकेत लोहिया, मानवलोकचे  सहकार्यवाह लालासाहेब आगळे, गावचे सरपंच रावसाहेब यादव , इन्फंट इंडियाचे दत्ता बारगजे, ग्राम पंचायत सदस्य,ग्रामसेवक, नदीयात्री, कृषी विभागाचे सूर्यकांत वडखेलकर, राजाराम बन, वनविभागाचे कस्तुरे व इतर अधिकारी कर्मचारी, गावातील  मुख्याध्यापक, शिक्षक शालेय विद्यार्थी, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.यावेळी गावातील महिलांनी जल कलशाचे पूजन केले. गावकऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन केले. त्यानंतर शाहीर सुधाकर देशमुख,राजू शेवाळे यांच्या नदीचा गोंधळ सादर करून जनजागृती केली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मानवलोकचे  सहकार्यवाह लालासाहेब आगळे यांनी केलं ते म्हणाले की, आपण दैनंदिन जीवन जगताना अनेक भाषा बोलत असतो. पण या पलीकडे निसर्गाची एक भाषा असते ती आपण समजून घेतली पाहिजे, उंच डोंगर हे माणसाने ध्येय उच्च ठेवावे हे सांगतात. खोल दऱ्या कधी कधी समोरच्या माणसांच्या मनातील खोल दुःख, वेदना ओळखाव्यात आणि त्या दूर करण्यास मदत करावी हे सांगतात, पक्षी प्राणी मुक्तपणे विहरावे जीवनाचा आनंद घ्यावा हे सांगत असतात. नदीचं निळशार पाणी आपल्याला मानवाने कुणाचाही द्वेष न करता इतरांच्या नितळपणे उपयोगी पडावे, अशी आपल्या अबोल भाषेतून सांगत असतात. त्यामुळे ही निसर्गाची भाषा समजून घेतल्यास आपल्याकडून निसर्गाला धक्का पोचणार नाही, असे सांगितले.

तर  चला जाणूया नदीला अभियानाचे राज्य समिती सदस्य अनिकेत लोहिया यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, भीमा, अशा मोठ्या नदीच्या यादीत मांजरा नदीचा समावेश होतो. पण लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे  मांजरा धरण जेंव्हा कोरडे पडले आणि लातूर शहराला रेल्वेने पाणी आणावे लागले तेंव्हा मांजरा नदी चर्चेत आली. अशा मांजरा नदीचा उगम आपल्या बिड जिल्ह्यात होऊन ती सातशे हून अधिक किलोमिटर वाहत जाते. शंभर मोठी शहरे आणि हजारो खेड्यांची तहान लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणीत ती हा प्रवास करते. आपण या नदीचे लाभधारक आहोत. हिच्या वाहण्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात समृद्धी आली आहे.

news reels

नदी, नीर, नारी यांचा ज्या समाजात पावित्र्य राखले जाते,  तो समाज सुसंस्कृत समजला जातो. त्यामुळे अशा जीवनदायिनी नदीची आजची स्थिती काय आहे. तिला सतत वाहत कसे ठेवता येईल तिला अमृत वाहिनी कसे करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ही चला जाणूया नदीला अभियान राबवण्यात येत आहे. खते आणि कीटकनाशके यांच्या अती वापरामुळे, नद्यात सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी, टाकण्यात येणाऱ्या राडारोडा, कचरा यामुळे नद्या दूषित होत आहेत. अशा प्रदूषित नद्यातिल पाणी पिण्यासाठी वापरल्याने मानवाचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे नद्यांच आरोग्य जर उत्तम राहील तर मानवी आरोग्य सुदृढ राहील हे लक्षात घेतलं पाहिजे. आज बिड जिल्ह्यातील यात्रेचा समारोप असेही लोहिया म्हणाले. नदी यात्रे विषयीची चित्रफीत यावेळी गावकऱ्यांना चित्ररथाद्वारे दाखवण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here