अमोल मिटकरी यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी इतिहास वाचायला हवा होता. तुम्ही ज्या जागेवर बसून शिवरायांच्या नावाला विरोध केला ती खुर्ची, जागा आणि तिचा सातबारा ही सर्व काही छत्रपतींची पुण्याई आहे. पण तुम्ही चुकलात. तुमच्या वागण्याचा निषेध, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्यावरही निशाणा साधला आहे. प्रवीणजी, नायडूंच्या वर्तवणुकीबद्दल तुम्ही काही बोलला नाहीत. कधी कधी मौन राहणे ही एक प्रकारची मूक संमती असते. महाराष्ट्र भाजप अजूनही गप्प का? असा सवाल करतानाच तुम्ही शिववप्रेमी आहात असं ऐकून आहे. त्यामुळे तुमच्या उत्तराची वाट पाहतोय, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
दरम्यान, याप्रकरणावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काल खुलासा केला होता. मी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्याने आक्षेप घेतला. त्यावर अध्यक्षांनी हे कुणाचं घर नाही. हे चेम्बर असून त्याचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं रेकॉर्डवर येणार नाही. यापुढे या गोष्टींचं भान ठेवा, असं नायडू यांनी सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते राज्य घटनेला धरून होतं. राज्यघटनेनुसार त्यांना कामकाज करावं लागतं म्हणून त्यांनी त्यानुसार सांगितलं. त्यात काही चुकीचं नाही. त्यात अवमान होण्यासारखंही काही नाही. उलट त्यांनी मला नव्हे तर माझ्या घोषणेला आक्षेप घेणाऱ्याला नायडूंनी रोखलं, असा दावा करतानाच मात्र, नॉन इश्यूचा इश्यू बनवून काही लोक राजकारण करत आहेत. विनाकारण वादाला जन्म देत आहेत, असं सांगतानाच महाराजाचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का? माझा स्वभाव पाहून तुम्हाला असं वाटतं का? मी तिथेच राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो, असंही उदयनराजेंनी सांगितलं. नायडूंनी काही चुकीची भूमिका घेतली असती तर त्यांनी माफी मागावी म्हणून मीच मागणी केली असती. पण ते चुकलेत असं मला वाटत नाही, असं उदयनराजे म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times