कोल्हापूर: कोल्हापुरातील सीपीआर या सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने गुरुवारी रात्री डॉक्टरांनी रुग्णास दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचाराअभावी गांधीनगर येथील एकाचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा कहर सुरू आहे. करोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल ३२०० च्या पुढे गेला असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रशासनाने विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पण उपलब्ध बेडची क्षमता आणि रुग्णांची वाढती संख्या यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.

वाचा:

काल रात्री गांधीनगर येथील मोहनलाल चावला या रुग्णास त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये दाखल करण्यासाठी नेले होते. केस पेपर काढल्यानंतर ते डॉक्टरांना भेटले, पण बेडच उपलब्ध नसल्याचे कारण सांगून डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. बराच वेळ विनंती करूनही डॉक्टरांचा नकार कायम राहिल्याने शेवटी नातेवाईकांनी त्या रुग्णास घरी नेले. उपचार न झाल्याने पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

वाचा:

खासगी रुग्णालयात सध्या रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे, त्यामुळे बहुतेक जण सरकारी रुग्णालयाकडे धाव घेत असल्यानं तिथं बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळं उपचारावर मर्यादा येत आहेत. सध्या कोल्हापुरात ३२०० हून अधिक करोना बाधित रुग्ण असून आत्तापर्यंत ८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या १८०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सीपीआर, डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटल, घोडावत हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यामुळे आता सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वाचा:

उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कोल्हापूरमध्ये सध्या लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरीही रुग्णांचा आकडा रोज दोनशे पेक्षा अधिक वाढत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here