मुंबई : उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या दहिसर-अंधेरी-डीएननगर या मेट्रो २ अ मार्गिकेतील स्थानक नामांतराचा विषय मालाड, गोरेगाव भागांत पेटला आहे. या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘पहाडी गोरेगाव’ व ‘लोअर मालाड’ स्थानकांच्या नावांवरून वाद चिघळला आहे. ही नावे बदलून अनुक्रमे ‘बांगुरनगर’ व ‘कस्तुरी पार्क करावीत, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

‘मेट्रो २ अ’ या मार्गिकेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होण्याच्या बेतात आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तरेशी जोडणारा हा मार्ग डीएननगर (अंधेरी पश्चिम) ते कांदिवली, मालाड, बोरिवलीहून दहिसरला जातो. यापैकी कांदिवलीतील डहाणूकरवाडी ते दहिसर या मार्गावरील सेवा एप्रिल महिन्यातच सुरू झाली. आता आठ स्थानकांचा पुढील व अखेरचा टप्पा सुरू होण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहे. असे असतानाच मार्गिकेवरील नियोजित स्थानकांच्या नावांबाबतचा वाद समोर आला आहे.

भारताची चिंता वाढवली; एकाच कारणामुळे ९ दिवसांत १३० लोकांचा मृत्यू; डॉक्टरही हैराण

या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव पश्चिमेकडे मालाडची खाडी आणि खाडीकिनारी पसरलेल्या कांदळवनाच्या भागात असलेल्या स्थानकाला ‘पहाडी गोरेगाव’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र हा परिसर वास्तवात ‘बांगूरनगर’ जवळ असून त्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे तेच नाव या स्थानकाला दिले जावे, अशी मागणी आधीच झाली आहे. तसेच या मार्गिकेवर पुढील नियोजित स्थानक हे ‘लोअर मालाड’ नावाने ओळखले जाणार आहे. हा भाग ‘मालाड पश्चिम’ म्हणून ओळखला जात असताना ‘लोअर मालाड’ या नावाची गरज नाही. त्या भागाला ‘कस्तुरी पार्क’ हे नाव द्यायला हवे, अशी मागणी स्थानिकांच्यावतीने मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत मिश्रा यांनी ‘एमएमआरडीए’कडे आधीच केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने त्या परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

‘या नियोजित स्थानकांची नावे बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीए आयुक्त, स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांना पत्रदेखील दिले आहे. बांगुरनगर नावाने या भागात पोलिस स्थानक, टपाल कार्यालय व निवासी वस्तीदेखील आहे. त्यामुळेच ही मागणी करण्यात आली असून त्यासंबंधीची स्वाक्षरी मोहीम आठवडाभर चालणार आहे’, असे सूर्यकांत मिश्रा यांनी सांगितले आहे. या स्वाक्षरी मोहिमेत बांगुरनगर येथील स्थानिक रहिवासी किशन तोष्णीवाल, सुरेश देढिया, श्याम हेडा, किशोर बट्टड यांनी पुढाकार घेतला आहे. माजी नगरसेवक समीर देसाई, अंजय श्रीवास्तव, प्रदीप उपाध्याय आदी सहभागी झाले आहेत.

नाव बदलण्याची प्रक्रिया क्लिष्ट

मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांची नावे ठरविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने एजन्सीची नियुक्ती केली आहे. एजन्सीने जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेकडील गॅझेटियरमधील नोंदीचा अभ्यास करून नावे निश्चित केली. त्यामुळे आता नामांतर करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असेल, असे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here