Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यासाठी मंगळवारपर्यंत भाजप आणि कॉंग्रेसचे ‘पहले आप पहले आप’ सुरु होते. मात्र आज (11 जानेवारी)  सकाळी भाजपकडून शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार (Nago Ganar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तसेच गाणार उद्या, गुरुवारी (12 जानेवारी) दुपारी बारा वाजण्यापूर्वी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांच्या प्रतिनिधीने ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली. दरम्यान, काँग्रेसचा उमेदवार निश्चितीसाठी मंगळवारी रात्रीही काँग्रेस नेत्यांची बैठक झाली नाही. आज, बुधवारी मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक होत आहे.

मंगळवारपर्यंत एकूण सहा उमेदवारांनी एकूण दहा अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या समर्थनाच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. कपिल पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

कपिल पाटील यांनी मेळावा घेत शिक्षक भारती शिक्षकांच्या प्रश्नासाठी कसा लढा देत आहे, याचा आढावा मांडला. फुले-शाहू-आंबेडकर अध्यापक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. अजय विठ्ठलराव भोयर, मृत्युंजय सिंह यांनीही अर्ज भरले.

मंगळवारीही काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवाराची घोषणा झाली नाही. शिक्षक भारतीचे उमेदवार नागो गाणार यांना बदलायचे का, यावर खल सुरु होते. काँग्रेसमध्येही विमाशिचे सुधाकर अडबाले की शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान, काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.

news reels

उद्या शेवटचा दिवस: अर्ज भरणाऱ्या सहा उमेदवारांमध्ये…

शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले, रामराव चव्हाण, अजय भोयर, मृत्यूंजय सिंग यांनी विभागीय शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या, गुरुवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहे. मागील निवडणूकीत त्यांनी भाजपचे समर्थित राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना कडवी लढत दिली होती. अवघ्या दोन हजार मतांनी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळीसुद्धा कॉंग्रेसने त्यांना समर्थन जाहीर केले नव्हते. काही बंडखोरांमुळे झाडे यांना पराभूत व्हावे लागले होते.

ही बातमी देखील वाचा…

नागपूरमध्ये धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कटले; 33 रेल्वेगाड्यांना विलंब, प्रवाशांची गैरसोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here