बीड: दादाहरी वडगाव येथे आणखी एका क्रूझर जिप आणि स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. यात महिलांचाही समावेश आहे. हा अपघात का झाला यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राखेमुळे अपघात झाल्याचा दावा काहींनी केला, तर पेट्रोल पंपवाल्यांनी खणलेल्या खड्ड्यामुळे दुर्घटना केल्याचा दावा केला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांची आहे.

मंगळवार (१० जानेवारी) रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान परळी वैजनाथ-गंगाखेड रोडवर दादाहरी वडगावच्या जवळ परळीकडून वडगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर (एम.एच. २६ एके २६६६) आणि क्रुझर जीप (एम.एच. २० इजे १०८४) यांचा भीषण अपघात झाला. यात अपघातात दादाहरी वडगाव येथील किशन इंगळे (वय ३२) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर जीपमधील सुमारे १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले.
धावत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटला; ३५ प्रवाशांनी भरलेली बस नाल्यात कोसळणार, तितक्यात…
या अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. थर्मलच्या राखेमुळे वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याचा अंदाज काहींनी वर्तवला. तर दुसरीकडे अपघाताच्या जवळच असलेल्या रस्त्यालगत पेट्रोल पंपाचे मालक मधुकर आघाव या माणसाने अनाधिकृतपणे पाईपलाईनसाठी रस्ता फोडला. त्यामुळे रस्त्यावर खड्डा पडला आणि हा खड्डा भरून घेतला नाही त्यामुळे हा अपघात झाला असेही काही स्थानिकांचे म्हणणे आहे. यावरून रात्री मोठा वाद विवाद नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोकोदेखील केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या अपघाताविषयी परिसरात विविध प्रकारच्या चर्चा ऐकू येत आहेत. हा अपघात राखेमुळे झाला की पेट्रोल पंपाच्या मालकांनी केलेल्या खड्ड्यामुळे झाला असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र यामध्ये खरा दोषी कोण हे अद्याप समजू शकलेले नाही.
भयंकर! ऑडी कारचा ऍक्सिलेटर दिला, बहिणींच्या सासरच्यांना चिरडत सुटला; घटना CCTVमध्ये कैद
पेट्रोल पंप मालकाने खणलेला खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा आहे, तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला असलेला राखेचा डोंगरही धोकादायक आहे. राख हवेमुळे परिसरात पसरत असल्याने वाहन चालकांना समोरच्या वाहनांचा अंदाज न आल्याने याआधीदेखील अनेक अपघात झाले आहेत.

या घटनेनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले झाले होते. मात्र संतप्त नागरिकांनी अपघात झाला त्याच ठिकाणी रास्ता रोको सुरू केला. पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको मागे घेण्यात आला. यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीदेखील झाली होती. मात्र परळी येथील थर्मलमधून निघणाऱ्या राखेमुळे अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here