‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा किताब जिंकल्यानंतर निलेश साबळेने मराठी मनोरंजन विश्वात खऱ्या अर्थाने पदार्पण केले. मात्र, या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी निलेश साबळेला अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. उमेदीच्या काळात निलेश साबळेने ‘ब्रेक’ मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कोल्हापूरमध्ये असताना निलेश साबळे यांना अशीच एक संधी मिळाली होती. तेव्हाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संगीतकार, गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या परिचितांपैकी एकाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी अवधूत गुप्ते कोल्हापुरातील त्यांच्या एका मित्राच्या घरी मिसळ खाण्यासाठी गेले होते. तेव्हा अवधूत गुप्ते यांच्या मित्राने त्यांना मिमिक्री करणाऱ्या एका मुलाची ओळख करुन दिली. या मुलाने अवधूत गुप्ते यांच्यासमोर आपली कला सादर केली आणि सगळ्यांना लोटपोट हसवले. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून निलेश साबळे हे होते.
निलेश साबळेची मिमिक्री पाहून तेव्हा अवधूत गुप्ते प्रचंड इम्प्रेस झाले होते. त्याचदिवशी संध्याकाळी कोल्हापूरमध्ये अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रम होता. निलेश साबळे यांची मिमिक्री पाहून अवधूत गुप्ते यांनी निलेश साबळेला, ‘तू माझ्या कार्यक्रमात मिमिक्री करशील का?, असा प्रश्न विचारला. निलेश साबळेंनी या प्रस्तावाला लगेच होकार दिला आणि त्या संध्याकाळी कार्यक्रम चांगलाच गाजवला.
हीरा आज ना उद्या चमकणारच होता: अवधूत गुप्ते
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अवधूत गुप्ते यांनी निलेश साबळे यांचे कौतुक केले. डॉ. निलेश बद्दल काय बोलायचं? आज अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाव आहेत ते! बाकी.. हीरा हा हीराच असतो आणि तो आज ना उद्या चमकणारच असतो. जेव्हा तो खाणीतल्या एखाद्या कामगाराच्या हाती लागतो, तेव्हा ते त्या कामगाराचं नशीब असतं.. हिऱ्याचं नव्हे, अशा भावना अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केल्या.