म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बिर्याणी खण्यावरून झालेल्या भांडणावेळी चावा घेतल्याचा राग मनात धरून आपल्याच मित्राचा एका तरुणानं खून केला. आरोपी हा कचरा वेचक आहे. मित्राची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कचरा पेटीतून कचरा डेपोत फेकण्यात आला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मनोहर शिवाजी कांबळे (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विनोद मधुकर शिंदे (वय ३२, रा. गणेशनगर, गवळीमाथा, भोसरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ कैलास मधुकर शिंदे याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि मनोहर हे दोघे मित्र होते. तसेच ते कचरा गोळा करून उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी विनोद आणि मनोहर यांच्यामध्ये बिर्याणी खाण्यावरून वाद झाला होता. तेव्हा विनोद याने मनोहरच्या चावा घेतला होता. त्याचाच राग मनोहरच्या मनात होता. विनोद कचरा पेटीमध्ये उतरून कचरा गोळा करीत असताना, मनोहरने त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यात विनोदचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कचरा पेटीत टाकून मनोहर पसार झाला होता. खुनाच्या घटनेनंतर चार दिवसांनी कंटेनरमधून मृतदेह असलेली कचरापेटी मोशी कचरा डेपोमध्ये नेण्यात आली होती. काही दिवसांनंतर मनोहर शहरात परतला होता. गुरुवारी पहाटे पोलिसांनी त्याला अटक केली.

अन् पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले

विनोद फिरस्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली नव्हती. तसेच कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध नव्हती. विनोद याचे कपडे आणि ज्या कचरा पेटीतून हा मृतदेह आला त्या परिसरासह पोलिसांनी सगळ्या कचरा वेचकांची माहिती गोळा केली. तेव्हा दोन कचरा वेचक बऱ्याच दिवसांपासून त्या ठिकाणी फिरकले नसल्याचे उघड झाले. त्यावरून प्रथम विनोद आणि नंतर मनोहर याची ओळख पटली. त्यानंतर गुरुवारी (२३ जुलै) पहाटे तीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपी मनोहर कांबळे याला अटक केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here