Aaditya Thackeray: पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीच राजकारण तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहीत सांडपाणी प्रक्रिया प्लांट (Sewage Treatment Plant) आणि इतर मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्लांटचे (Sewage Treatment Plant) भूमीपूजन करण्यात येणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता श्रेयवादाची लढाई रंगणार आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहीले आहे. आदित्य ठाकरे यांनी या पत्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांडपाणी प्रक्रिया प्लांट आणि खारे पाणी गोडे करणे या दोन्ही प्रकल्पांना गती देण्यात आली असल्याची आठवण पत्रातून महापालिका आयुक्तांना करून दिली. एसटीपी (Sewage Treatment Plant) प्रकल्पांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही अद्याप भूमिपूजन का नाही? असा सवाल आदित्य यांनी केला. मागील सहा महिन्यांचा कालावधी कशासाठी वाया घालवला, असा प्रश्नही आदित्य यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.
I’ve written to @mybmc MC Chahal ji with regards to Mumbai’s STP and Desalination projects seeking an update on the same.
Since the betrayal & change in Govt, we haven’t heard much on it, start delayed by 6 months.
We were working on reducing monsoon dependency of Mumbai pic.twitter.com/m7yBH2CYCn
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 11, 2023
खा-या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला होत असलेल्या उशिराबद्दलही आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी प्रकल्पांचे भूमिपूजन लांबवल्याचा सूर पत्रातून उमटला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पांसह विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात कोणत्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रो 2 ए (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumbai Metro 7) या मार्गिकेवरील मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागील वर्षी करण्यात आले होते. दोन्ही मार्गिकेवरील एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील काँक्रिटच्या रस्ते बांधकामाचे भूमीपूजन होणार आहे. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतंर्गत 52 दवाखान्याचे उद्घाटन होणार आहे.