करोना संसर्गाचा लोकांनी किती धसका घेतला आहे, हे तालुक्यातील या घटनेने सिद्ध झाले. केवळ पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर आता आपल्याला देखील करोनाचा संसर्ग होणार या भीतीनेच तरुणाने आत्महत्या केली. पण दुपारी आत्महत्या केलेल्या या दुर्देवी तरुणाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तो निगेटिव्ह आला. केवळ भीतीनेच या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली.
गडहिंग्लज () तालुक्यातील लिंगनूर कसबा नूर या गावातील ही घटना आहे. या गावातील सुधीर दत्तात्रय येसरे हा ३२ वर्षाचा तरूण शेती करतो. चार दिवसांपूर्वी गावात एक जण करोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना प्रशासनाने गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर येथे नेले. तेथे सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल येईपर्यंत सर्वांना तेथेच ठेवण्यात येणार होते. त्यानुसार येसरे याला देखील तेथे ठेवण्यात आले. अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने तो अस्वस्थ होता. आपला अहवाल काय येणार याची त्याला काळजी लागली होती. अहवाल पॉझिटिव्ह येणार अशी त्याला भीती वाटत होती. यामुळे त्याच्या अस्वस्थेत भर पडू लागली. यामुळे घाबरलेल्या येसरेने कोव्हिड सेंटरमधील बाथरूममध्ये आत्महत्या केली.
दोन दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी दुपारी सर्वांचा अहवाल आला. ज्यांचा ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी वाहन मागवण्यात आले. त्यानुसार या सेंटरवर वाहन आले. येसरे याचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याला घरी पाठवण्यासाठी शोधाशोध सुरू झाली. तो बराच वेळ सापडेना. शेवटी बाथरूममध्ये त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अहवालाची वाट न पाहताच त्याने आपली जीवनयात्रा संपवली होती. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ते पाहण्यासाठी तो मात्र राहिला नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times