मुंबई : वाहनांकरिता विशेष परवान्यांसह एकूण सात वाहन सेवांचे काम आता घरबसल्या करणे शक्य होणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात या ऑनलाइन सेवा सुरू करण्याचा निर्णय मोटार परिवहन विभागाने घेतला. यामुळे राज्यातील नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन कागद संबंधित सेवा ऑनलाइनने वापरता येणार आहे.

३४व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत एनसीपीए सभागृह, नरिमन पॉइंट येथे करण्यात आले. सप्टेंबर २०२२मध्ये केंद्र सरकारने ५८ सेवा आधार क्रमांक वापरून फेसलेस करण्याच्या सूचना दिल्या असून यातील १८ सेवा यापूर्वीच फेसलेस पद्धतीने सुरू आहेत. बुधवारी सात सेवा संपर्करहित (फेसलेस) करण्यात आल्या. ४६ लाख नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. सध्या एकूण

२५ सेवांची कामे घरबसल्या पूर्ण करता येणार आहेत, असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

कार्यालयात येण्याची गरज नाही

या सेवांचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे आधारकार्ड व त्या आधारकार्डला जोडलेला क्रमांक असणे आवश्यक आहे. आधार क्रमांकामधील मोबाइलवर ओटीपी पाठविण्यात येईल. याची नोंद परिवहन या संकेतस्थळामध्ये केल्यास अनुज्ञप्ती/नोंदणी प्रमाणपत्र यामधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा होऊन अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख व मोबाइल क्रमांक याची खातरजमा झाल्यामुळे आता या सेवांकरिता अर्जदारास कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही.

एकाच तरुणीशी दोघा शेजाऱ्यांची जवळीक, वादातून तुंबळ हाणामारी, विवाहित तरुणाने जीव गमावला

८४ सेवा ऑनलाइन

मोटार वाहन विभागामार्फत एकूण ११५ अनुज्ञप्ती नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधीत सेवा देण्यात येत असून, यापैकी ८४ सेवा ऑनलाइन सुरू आहेत. ऑनलाइन सेवेत संबंधित सेवेचा अर्ज ऑनलाइन भरण्याची मुभा असते. अर्जाच्या पुढील कार्यवाहीसाठी नागरिकांना कार्यालयात गेल्यानंतर कमी वेळेत त्यांचे काम पूर्ण होणे शक्य असते.

या सेवा घरबसल्या

– वाहनांकरिता विशेष परवाना.

– वाहनांकरिता तात्पुरता परवाना.

– दुय्यम योग्यता प्रमाणपत्र.

– दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती.

– शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल.

– कंडक्टर अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल.

– धोकादायक मालवाहने चालविण्यास मान्यता.

रस्ता सुरक्षा सामूहिक जबाबदारी

रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करताना वेगमर्यादा आणि वेळमर्यादा पाळली पाहिजे.

– शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री

अपघात घटले

अपघातांचे प्रमाण मुंबई शहर आणि उपनगरांत २७ टक्के, नंदुरबारमध्ये १८ टक्के, तर अकोल्यात १६ टक्के कमी झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांच्या रस्ता सुरक्षा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

42 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here