छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेत्यांनी रान उठवले होते. यामध्ये नितेश राणे आघाडीवर आहेत. नितेश राणे यांनी अजित पवार यांची पाठराखण करणाऱ्या अमोल कोल्हे यांच्यावरही नुकतीच सडकून टीका केली होती. अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपतींची भूमिका करतात, त्यामध्ये काहीही विशेष नाही, असे नितेश यांनी म्हटले होते. त्या टीकेला अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले. मी कलाकार आहे, कलाक्षेत्र माझ्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. माझ्या उत्पन्नाचे स्रोत मी उजळ माथ्याने चारचौघात सांगू शकतो. नितेश राणे यांचीही परिस्थिती अशीच असेल, अशी आशा करतो. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी उगाच माझ्यासारख्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवर माझ्या मतदारसंघातील लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यावर अकारण भाष्य करु नये, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.
दाढी काढली तर अमोल कोल्हेंना कोणी ओळखणार नाही, २०२४ मध्ये पराभव करणार: नितेश राणे
नितेश राणे यांनी वर्धा येथील कार्यक्रमात अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. तो कुठलातरी अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. त्याला सिरियसलसाठी पैसे दिले जातात. तो फक्त नावासाठी निवडून आलेला आहे. त्याला २०२४ साली पराभूत करून टाकू. दाढी काढल्यावर त्याला कोणी ओळखणार पण नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.