वाचा:
साकेत गोखले यांचं मिरारोड येथील काशिमिरा भागातील इमारतीत घर असून आज सायंकाळी इमारतीच्या आवारात शिरून आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी गोखले यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच गोखले यांनी आपल्या घरातून व्हिडिओ शूट करून तो ट्विटरवर पोस्ट केला. त्यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व ठाणे ग्रामीण पोलिसांना टॅग केले. या व्हिडिओची अवघ्या काही मिनिटांतच देशमुख यांनी दखल घेतली व वेगाने पावले टाकण्यात आली. गंभीर बाब म्हणजे गोखले यांच्या आईलाही धमकावण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणाला वेगळंच वळण लागताना दिसत आहे.
गुंडगिरी खपवून घेणार नाही: गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी गोखले यांच्या ट्विटला रिप्लाय देताना ही बाब सरकारने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केले आहे. देशमुख यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेच शिवाय तातडीने गोखले यांना पोलीस सुरक्षाही पुरवली. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या गुंडगिरीला जराही थारा दिला जाणार नाही, असे देशमुख यांनी गोखले यांना आश्वस्त केले. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर गोखले यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी गोखले यांच्या घरी भेट दिली व निदर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांना सांगितले.
वाचा:
गोखले यांच्या ‘त्या’ दाव्याने खळबळ
साकेत गोखले आधीपासूनच चर्चेत आहेत. राज्यात गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्याच्या कंपनीला दिले होते, असा गंभीर आरोप साकेत गोखले यांनी केला आहे. तसे पुरावेच त्यांनी दिले आहेत. त्याचा आधार घेत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु जो प्रकार उघड झाला आहे त्यावरून असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. त्यामुळेच या प्रकाराची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times