शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास युतीचा विचार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आंबेडकरांचं वक्तव्य – prakash ambedkar big statement about alliance with cm eknath shinde balasahebanchi shivsena party
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. युत्या आणि आघाड्यांचं गणितही सातत्याने बदलत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर आणखी एक नवं समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू शकत नाही. तसंच भाजपसोबत असलेल्या पक्षाशीही युती करू शकत नाही. मात्र शिंदे यांच्या पक्षाने भाजपची साथ सोडल्यास युतीचा विचार केला जाऊ शकतो,’ असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांची भेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात होती, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेवर काय म्हणाले आंबेडकर?
‘काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा खिमा केला. मला माझी आणि माझ्या पक्षाची ताकद माहीत आहे. महापालिकेत आमची आणि शिवसेनेची युती होऊ शकते, मात्री जी चर्चा झाली ती सार्वजनिक झालेली नाही. चार भिंतीमधील भूमिका उद्धव ठाकरे हे जाहीर का करत नाहीत, हे त्यांनाच माहीत आहे,’ असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.