म. टा. प्रतिनिधी, : कोव्हिड- १९ विषाणू प्रादुर्भावाच्या टप्प्यातून जात असलेल्या उपराजधानीसाठी आणखी एक दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला. उपचारादरम्यान ४ करोना बाधितांचा झालेला मृत्यू आणि नव्याने जोडलेल्या शहरातील १५१ आणि ग्रामीण मधील ७१ अशा २२२ जणांच्या प्रादुर्भाव साखळीने यात भर घातली. जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवशी नोंदविली गेलेली ही विक्रमी प्रादुर्भाव साखळी ठरली आहे. त्यामुळे आतापर्यंत करोनाची लागण झालेल्यांच्या संख्येने नवी उसंडी मारत आता ३६८७ पर्यंतचा पल्ला गाठला आहे. त्यापैकी २७८९ करोनाबाधित एकट्या शहरातील तर ८९८ ग्रामीणमधील आहेत.

शहरापाठोपाठ आता ग्रामीणमध्येही करोना वेगाने पसरत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात पाच हजाराच्या दिशेने सुरू असलेली ही घोडदौड नव्या संकटाला निमंत्रण देणारी ठरत आहे. करोनाच्या या दहशतीत उद्यापासून लागणाऱ्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दिवसभरता घडलेली एकमेव समाधानाची बाब म्हणजे शुक्रवारी ९४ बाधित करोनामुक्त झाले. त्यापैकी ७६ ग्रामीणमधून तर १८ शहरातून करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या २३०७ वर गेली. करोना मुक्तीची ही टक्केवारी पुन्हा ६२.५७ वर घसरली. तर आतापर्यंत करोनाचा प्रादुर्भाव होऊन दगावलेल्यांचा शहरातील आकडा ६९ वर पोचला आहे. नव्याने करोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्यांपैकी अँटिजन रॅपिड टेस्टमध्ये ४५ जणांच्या रक्तात तर एम्सच्या प्रयोगशाळेत ४० जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यात करोनाचा अंश आढळला. या खेरीज खासगी लॅबमधून ३७, मेयोतून ३५, माफ्सूतून २७, मेडिकलमधून २५, निरीतून १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

वाचाः

करोनाची बाधा झाल्यानंतर दगावलेल्या चौघांपैकी एक झिंगाबाई टाकळी येथील ४६ वर्षीय व्यक्तीवर मेडिकलच्या कोव्हिड रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. करोनाचे बळी ठरलेल्या आणखी दोघांची नोंद मेयोतून घेण्यात आली. त्यापैकी एका ३५ वर्षीय तरुणाला डोक्याला मार लागल्यानंतर अत्यवस्थ स्थितीत तपासणीसाठी आणले गेले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचे निधन झाले. रस्ता अपघातात हा तरुण जखमी झाला होता. तर दगावलेला तिसरा ६२ वर्षीय करोना बाधित हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा रहिवासी होता. तर चौथ्या करोनाबाधितावर जिल्ह्याबाहेर उपचार सुरू होते.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये करोनाची बाधा झालेल्या १३१० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३६९ रुग्णांवर आमदार निवासातल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये तर ३६० जणांवर मेयोत आणि २६४ जणांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

वाचाः

नागपुरात लॉकडाऊन

संचारबंदीच्या गोंधळात उपराजधानीत उद्या शनिवार व परवा रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. शहरातील बेजबाबदार नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी हा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यानंतर २७ ते ३० जुलैपर्यंत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शहरभर फिरून नियम पाळण्यासाठी जनजागृती करतील. ३१ जुलैला दुपारी पुन्हा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर शहराच्या भल्यासाठी आवश्यक तो पुढील निर्णय घेण्यात येईल. आज महापौर, खासदार, आमदार, आयुक्त, प्रभारी पोलिस आयुक्त व इतर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here