नागपूर : जन्मठेपेची शिक्षा भोगताना पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगाराची त्याच्या प्रेयसीसमोरच निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अजनी पोलिस स्टेशनअंतर्गत पार्वतीनगर परिसरात घडली. विक्की जयसिंग चंदेल (वय २८, रा. मनीषनगर, बेलतरोडी), असे मृताचे नाव आहे. नववर्षापासून उपराजधानीत हत्येचे सत्र सुरूच असून आतापर्यंत उपराजधानीत खुनाच्या पाच घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विक्कीच्या खूनप्रकरणात अजनी पोलिसांनी उमाशंकर ऊर्फ राकेश प्रल्हाद पाली (वय ३३), त्याचा भाऊ सोमू पाली, लालू पाली, भाचा शुभम कोकास व अन्य दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून शुभम, सोमू व लालूला अटक केली. राकेश व अन्य मारेकऱ्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

बुधवारी रात्री विक्की व त्याची २७ वर्षीय प्रेयसी मोटारसायकलने मनीषनगरकडे जात होते. नरेंद्रनगर चौकात राकेश याचा भाऊ सोमू व भाचा शुभमच्या पानठेल्यावर विक्की थांबला. त्याने सिगारेट मागितली. याचदरम्यान रागाने बघितल्याने सोमूने विक्कीसोबत वाद घातला. सोमू व शुभमने विक्कीला मारहाण करायला सुरूवात केली.

पोलिसांचीच ‘मैदानी’ परीक्षा! लेखी परीक्षा नंतर ठेवल्याने भार, ७ लाख उमेदवारांच्या चाचणीचे आव्हान

विक्कीच्या प्रेयसीने पानठेल्यावरील कैची हातात घेत सोमू व शुभमला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रकरण शांत झाले. विक्की व त्याची प्रेयसी मोटारसायकलने घरी जायला निघाले असता शुभम, सोमू व त्याच्या दोन साथीदारांनी विक्कीला अडवले. राकेशने घरी बोलावल्याचे त्यांनी विक्कीला सांगितले. त्यानंतर सर्व जण राकेशच्या पार्वतीनगर येथील घराजवळ गेले. घराजवळ जाताच पाच जणांनी विक्कीला घेराव घातला. विक्कीला बघताच राकेशने चाकूने त्याच्या छातीवर सपासप वार करायला सुरूवात केली. शुभमनेही कुऱ्हाडीने विक्कीवर वार केले. विक्कीची प्रेयसी कशीबशी तेथून पळाली. बाजूच्या गल्लीत उभ्या कारमागे लपली. तिने मैत्रिणीला घटनेची माहिती दिली. तिची मैत्रीण व मित्र तेथे आले. तोपर्यंत मारेकरी पसार झाले.

विक्कीची प्रेयसी तसेच त्या दोघांनी जखमी विक्कीला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून विक्कीला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, अजनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. घटनेची माहिती घेत पोलिसांनी गुरूवारी तिघांना अटक करून दोघांना ताब्यात घेतले.

बुधबावरे हत्याकांडात झाली होती जन्मठेपेची शिक्षा

राकेश, विक्की चंदेल व संजय ऊर्फ बंड्या वाघाडे या तिघांनी २०१३मध्ये अमित ऊर्फ पप्पू बुधबावरे (रा. चुनाभट्टी) याची हत्या केली होती. या हत्याकांडात तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मारेकरी तेव्हापासून कारागृहात शिक्षा भोगत होते. दहा दिवसांपूर्वी तिघेही पॅरोलवर कारागृहातून बाहेर आले. राकेशविरुद्ध खुनाच्या तीन गुन्ह्यांसह आठ गुन्हे तर विक्कीविरुद्ध दोन हत्यांसह पाच गुन्हे दाखल आहेत. कारागृहात असताना राकेश व विक्कीत सतत वाद व्हायचे, असेही कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here