Nashik graduate constituency | काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही. तर ज्यांची भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, त्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेसची मोठी नामुष्की झाली आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. आता सत्यजीत ता्ंबे भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.

 

Satyajeet Tambe Nashik Election
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक

हायलाइट्स:

  • आम्ही काल रात्री संपूर्ण अहवाल हायकमांडला पाठवला आहे
  • आज हायकमांड निर्देश देईल त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेऊ
मुंबई: सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्व पूर्वनियोजित आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाशी दगाफटका केला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. काल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली होती.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले. आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही काल रात्री संपूर्ण अहवाल हायकमांडला पाठवला आहे. आज हायकमांड निर्देश देईल त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेऊ. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. त्यांनी आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले की, आम्ही भाजपचा पाठिंबा घेणार आहोत. हा काँग्रेस पक्षाशी दगाफटका असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.
एनएसयूआय ते युवक काँग्रेसमध्ये कामाचा ठसा, संघटनेला २२ वर्ष दिली, सत्यजीत तांबेंनी यावेळी ठरवलं हीच ती वेळ

भाजप दुसऱ्यांची घरं फोडतेय, नाना पटोलेंची टीका

सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्वकाही पूर्वनियोजित होते. या भागातील पदवीधर लोक अडाणी नाहीत. भाजपकडून लोकांना भय दाखवून घरे फोडण्याचे काम सुरु आहे. आज भाजपला या सगळ्याचा आनंद वाटत आहे. भाजपच्या प्रमुखांची वक्तव्ये पाहता त्यांना या सगळ्याचा आनंद वाटतोय. पण एक दिवस भाजपचे घर फुटेल तेव्हा त्यांना दु:ख कळेल, असे नाना पटोले यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?

ही निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय खेळ्या सुरू होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत सगळीच अनिश्चिता होती. सर्व राजकारण सत्यजीत तांबे यांच्याभोवती फिरत होते. त्यानुसार शेवटच्या क्षणी नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. भाजप त्यांना पाठिंबा देऊन बिनविरोध निवडून आणू शकते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपली सत्यजीत तांबे यांच्यावर नजर असल्याचे सांगितले होते. तरीही काँग्रेस पक्ष गाफील राहिला.
नाशिक पदवीधरमध्ये मोठा ट्विस्ट, मुलासाठी बापाची माघार, सत्यजीत तांबेंचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल!
सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजीत तांबे यांच्या निर्णयामुळे पक्षीय पातळीवर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. केंद्रातही वजन असलेल्या थोरात यांना पक्षातील आणि त्यांच्याच मतदारसंघातील आणि तेही नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांना या सगळ्याची अगोदरच कुणकुण लागली होती. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याला फोन करुन सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना पक्षातही घेऊ नका, असे सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here