अंबरनाथमधील उबाळे कुटुंबातील दोन मुली झाल्या पोरक्या
पत्नी वैशालीला शिर्डीला देवदर्शनाला जाण्याचे पास मिळाले आणि तिने आपल्या पतीकडे म्हणजे नरेशकडे साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा हट्ट धरला. नरेश उबाळे एका वाईन शॉपमध्ये काम करत असल्याने त्याला सुट्टी मिळत नसे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी नरेश यांनीदेखील कधी नव्हे ती सुट्टी घेतली आणि गुरुवारी रात्री बसमधून निघाले.
नरेश यांना ३ मोठे भाऊ असून त्यांच्या घरातील एकूण १७ सदस्य देवदर्शनाला गेले होते. नरेश, पत्नी वैशाली, मुलगी निधी व मधुरा यांच्यासह शिर्डीला निघाले. पहाटे झालेल्या अपघातात नरेश उबाळे व वैशाली उबाळे यांचा मृत्यू झाला. तर ९ वर्षीय निधी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आई वडिलांच्या निधनाने निधी व मधुरा पोरक्या झाल्या आहेत.
अपघातात बारस्कर कुटूंबातील दोन जणांचा मृत्यू
मोरीवली गावातील सुहास बारस्कर, पत्नी आणि दोन मुलीसुद्धा याच बसूनमधून शिर्डीला निघाल्या होत्या. या अपघातात बारस्कर यांच्या पत्नी श्रद्धा आणि त्याची चिमुरडी मुलगी श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुहास बारस्कर आणि मोठी मुलगी शिवन्या हे बचावले आहेत.
मोरीवली गावातील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीचे मालक गेले अनेक वर्षे मोफत कर्मचारी आणि ओळखीतल्या लोकांना शिर्डीला देवदर्शनाला घेऊन जातात. उबाळे आणि बारस्कर कुटुंब पहिल्यांदाच शिर्डीला गेले होते, असे स्थानिकांनी सांगितले.