Graduate Constituency Election Amravati : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 34 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज उमेदवाराचे वय कमी असल्याच्या कारणाने बाद करण्यात आले तर सध्या 33 जणांचे अर्ज वैध ठरले असून त्या अर्जांना स्विकृती देण्यात आली आहे. यंदा भाजपने  रणजीत पाटील (Ranjit Patil) यांना तिसऱ्यांदा सधी दिली आहे. तर महाविकास आघाडीनेही आपला उमेदवार दिला आहे.

काल गुरूवारी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण 34 जणांनी नामांकन दाखल केले आहेत. आज विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी अकरापासून छाननी प्रक्रिया सुरु झाली होती. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीसाठी 34 उमेदवारांकडून 44 अर्ज प्राप्त होते. त्यापैकी उमेदवार गजानन नेहारे यांचे वय 30 पेक्षा कमी असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र बाद ठरविण्यात आले. सोमवार 16 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीतील प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून खरी रणधुमाळी उडणार आहे. दरम्यान या मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढतीचे चित्र आहे. 30 जानेवारीला मतदान होणार आहे.

यांचे अर्ज स्वीकृत…

news reels

अर्ज स्वीकृत झालेल्या उमेदवारांमध्ये गोपाळ वानखेडे, पांडुरंग ठाकरे, अरुण सरनाईक, किरण चौधरी, संदेश रणवीर, प्रा. डॉ. प्रफुल्ल राऊत, शरद झांबरे, श्याम प्रजापती, अ‍ॅड. धनंजय तोटे, माधुरी डहारे, धनराज शेंडे, मीनल ठाकरे, मधुकर काठोळे, आनंद राठोड, राजेश गावंडे, डॉ. रणजित पाटील (भाजप), डॉ. प्रवीण चौधरी, अनिल ठवरे, अनंतराव चौधरी, संदीप मेश्राम, उपेंद्र पाटील, लक्ष्मीकांत तडसे, नामदेव मेटांगे, डॉ. गौरव गवई, अनिल अमलकार, धीरज लिंगाडे (महाविकास), भारती दाभाडे, प्रवीण बोंद्रे, नीलेश पवार, सुहास ठाकरे, विकेश गवाले, अ‍ॅड, सिद्धार्थ गायकवाड, राजेश दांदडे यांचा समावेश आहे.

भाजपला साथ की कॉंग्रेसला संधी 

गेल्या 12 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे रणजीत पाटील या पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. मात्र त्यांनी प्रभावीपणे काम केले नसून पदवीधरांच्या समस्या मांडल्या नाहीत. त्यामुळे पदवीधरांनाही आता बदल हवा असून त्यांची साथ आम्हाला मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय मोठ्या संख्येत इतर उमेदवारही निवडणूकीच्या रिंगणात असल्याने यांची मनधरणी करुन त्यांना आपल्यासोबत घेणे प्रमुख उमेदवारांसाठी कठीण ठरणार असल्याचे चित्र आहे.

ही बातमी देखील वाचा…

काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here