पुणे: ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत बीडच्या अतिष तोडकरने गादी विभागातील ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. अवघ्या २१ वर्षाच्या अतिषने सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली. पण अतिषचा इथपर्यंतच हा प्रवास अतिशय खडतर होता.

अतिषचे वडील सुनील तोडकर हे देखील कसलेले पैलवाव आहेत. मुलाने मोठा पैलवान व्हावं देशासाठी ऑलम्पिक खेळून पदक मिळवावं, असं त्यांचं स्वप्न होतं. अतिषला वयाच्या बाराव्या वर्षीच कुस्तीचं वेड लागलं. पोराचं कुस्ती वेड पाहून स्वतः पैलवान असलेल्या सुनील तोडकर यांनी दिनेश गुंड यांच्या जोग महाराज व्यायाम शाळेत दाखल केलं. पोरगं चांगल्या कुस्त्या मारायला लागलं. बापाची छाती अभिमानाने फुगत होती. पण, खिसा फटका होता.

हेही वाचा –घरात बसून बोर होत होता, मग असं काही केलं क्षणात कोट्यधीश झाला…

पोराच्या कुस्तीसाठी पैसा कुठून आणणार, सुनील तोडकरांना प्रश्न

पोराची कुस्ती थांबता कामा नये असा ध्यास सुनील तोडकर यांनी केला होता. पैसे नाही मुलाचा खर्च करायचा कसा, या प्रश्नाने रात्रीची झोप उडाली होती. अखेर काळजावर दगड ठेवला आणि जीवापाड प्रेम असणारी वडिलोपार्जित आपली ५ एकर जमीन विकली. दुष्काळी आष्टी तालुक्यात मंगळूर गावात जिरायत ९ एकर जमीन होती. त्यापैकी ५ एकर जमीन विकून पोराचा खर्च पूर्ण केला.

Sunil Todkar

अतिष तोडकरचे वडील सुनील तोडकर

पोराचं यश पाहून जमीन विकल्याचं दु:ख होत नाही

पोराच्या एक विजयाबद्दल सुनील तोडकर अगदी भरभरून बोलतात. मी पाच एकर जमीन विकली याचं मला अजिबात दुःख नाही. अजून चार एकर शेती माझ्याकडे आहे त्यात मी सुखाने जगेल. मात्र, माझ्या पोरानं माझ्या या संघर्षाचं खऱ्या अर्थानं सोनं केलं. मी ज्यावेळेस घरातून माझी गाडी घेऊन निघतो त्यावेळेस मी विकलेली जमीन माझ्या रस्त्यातच असते. पण, मला तिकडे पाहून अजिबात दुःख होत नाही. कारण, मी घरातून माझ्या मुलाने मिळवलेले मेडल आणि प्रमाणपत्र पाहून निघालेला असतो. मला जमीन विकल्याचे तीळ मात्र दुःख होत नाही.

हेही वाचा –कुटुंब घरात टीव्ही पाहात होतं; अचानक छतावरुन १० फुटांचा अजगर खाली पडला, अन् मग

अतिष तोडकरची ही तिसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेत कांस्य दुसऱ्या स्पर्धेत रोप्य आणि आता तिसऱ्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकलं आहे. तो आतापर्यंत १६ राष्ट्रीय स्पर्धा खेळला आणि त्यात तीन सुवर्णसह आठ पदक त्याने जिंकले. आतिष आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मल्लांनाही हरवायला लागला आहे.

आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. माझ्या अतिशने एक दिवस ऑलिंपिक खेळून देशासाठी सुवर्णपदक जिंकावे, अशी आशा व्यक्त करताना सुनील तोडकर यांच्या डोळ्यासमोरुन सर्व संघर्ष जात असताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

हेही वाचा –५० हजार वर्षात पहिल्यांदा आकाशात अनोखा नजारा दिसणार, १ फेब्रुवारीला रात्रीचा दिवस होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here