काका पवारांचा शिष्य म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याला मॅटवरच्या कुस्तीचा तगडा अनुभव आहे. आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बालेवाडी येथे झालेल्या ६३व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा तो विजेता होता. मूळचा अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र असणारा हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याकडून कित्येक वर्ष महाराष्ट्र केसरीचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुन वीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. शिर्डी येथे झालेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे. जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत येऊनसुद्धा पैलवान हर्षवर्धनने स्पर्धेतून माघार घेतली होती. बालेवाडी येथे महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायचीच, अशा निर्धाराने हर्षवर्धन अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. ही लढत जिंकून हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपले नाव कोरले होते. यंदा हर्षवर्धनला डबल महाराष्ट्र केसरीचा मान मिळवण्याची संधी आहे.
उपांत्य फेरीत मित्राशी लढाई
हर्षवर्धन सदगीर यंदा गादी विभागातून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात हर्षवर्धनला त्याचा मित्र शिवराज राक्षेचा सामना करावा लागणार आहे. आज संध्याकाळी आधी मॅट आणि त्यानंतर माती विभागातील अंतिम लढती खेळवण्यात येतील. दोन्ही गटातील अंतिम विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरीची लढत होईल. आपल्याच मित्राशी लढत होत असल्याने हर्षवर्धन सदगीरचा उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेच्या मनात संमिश्र भावना आहेत. एकाच वस्तादाचे पठ्ठे असल्याने त्यांनी देखील आमच्या दोघांवर देखील खूप मेहनत घेतलेली आहे. त्यात आम्ही दोघेही एकत्रच तयारी करतोय. यंदा माझा महाराष्ट्र केसरी होण्याचा इरादा पक्का आहे, अशी भावना शिवराज राक्षेने बोलून दाखवली होती.
हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज
हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीच्या किताबावर दुसऱ्यांदा नाव कोरणार का, याकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. माझ्यावर अंतिम फेरीचा कोणताही दबाव नाही. मी आणि शिवराज दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील आहोत. आमच्या दोघांचीही तयारी चांगली आहे. जो मॅटवरती डावपेच चांगले टाकेल तोच कुस्ती मारेल.आम्ही दोघेही एकाच तालमीतील आहोत दोघांपैकी कोणीही जिंकलं तरी गदा आमच्याच तालमीत येईल, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सदगीरने व्यक्त केली.