नवी मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची पक्षात घुसमट होत असल्याची चर्चा वारंवार सुरू असते. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विविध नेत्यांकडून त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा काही वेगळा राजकीय निर्णय घेणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे. अशातच पनवेल येथील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी सूचक वक्तव्य केलं आहे.

‘माझ्यासमोर बसलेल्या गर्दीलाच कुणाची नजर लागेल की काय याची भीती वाटत आहे. या गर्दीवरुनच आता मीठ मोहरी ओवाळून टाकण्याची गरज आहे. राजकारणात संकट प्रत्येकावर येतं, मुंडे साहेबांनाही त्रास झाला. तुम्ही जमवलेली गर्दीच माझी ताकद आहे,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी पनवेलमधील खांदा कॉलनीतील भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं आहे. पक्षात होणारी घुसमट, तसंच समर्थकांमधूनच तयार होणारे पर्यायी चेहरे या पार्श्वभूमीवर पंकजा यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

नामदेव शास्त्रींनाही टोला?

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. काही वर्षांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळाव्याला आक्षेप घेतला आणि भगवानबाबांचं जन्मगाव सावरगावात पंकजांच्या दसरा मेळाव्याची सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, ‘मी गोपीनाथ गड का बांधला? त्याची दारं कुणासाठीही बंद होणार नाहीत, यासाठी तो शक्तीचा गड तयार केला.’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन, १०० कोटींच्या खंडणीची मागणी

दरम्यान, नामदेव शास्त्री हे नुकतेच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही उपस्थित राहिले होते. युवा दिनानिमित्त मुंबईत तर्पण युवा पुरस्कार झाला, त्यासाठी नामदेव शास्त्रींची खास उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं आयोजन फडणवीसांचे खास असलेल्या श्रीकांत भारतीय यांनी केलं होतं. खुद्द श्रीकांत भारतीय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भगवानगडावरही गेले होते. नामदेव शास्त्रींना अनाथ आणि दिव्यांगांविषयी जो जिव्हाळा आहे त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं, यात कोणताही राजकीय हेतू नाही, असंही स्पष्टीकरण भाजपमधील एका नेत्याने दिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here