कीर्तनात दाखले देताना ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदोरीकर यांच्याविरुद्ध संगमनेरच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यात कोर्टाने त्यांना समन्स काढले असून सात ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार आहे. खटला दाखल झाल्यानंतर भाजप आणि मनसेच्याही काही नेत्यांनी इंदोरीकरांची भेट घेतली.
हेही वाचा:
शनिवारी सकाळी विखे यांनीही इंदोरीकरांच्या ओझर येथील घरी जाऊन भेट घेतली. भगवद्गीतेची प्रत देऊन इंदोरीकरांनी विखेंचे स्वागत केले. भेटीनंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘इंदोरीकर महारांजाबद्दल राज्य सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. असे असले तरी महाराजांनी त्यांचे समाजप्रबोधनाचे काम सुरू ठेवावे. भविष्यातील लढाईसाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्यासंबंधी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेविषयी अधिक भाष्य करणार नाही. वास्तविक त्यांनी दिलगिरी व्यक्त करूनही त्यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. सरकारने महाराजांबाबत सहानुभूती दाखवायला हवी होती. मात्र, सध्या सरकारच असंवेदनशील झाले आहे. इंदोरीकरांनी संत विचारांनी राज्यात सुरू केलेल्या प्रबोधनाच्या कार्याला लोकमान्यता मिळाली आहे. त्यांनी सुरू केलेल्या कामाला अध्यात्मिक अधिष्ठान आहे. हे काम त्यांनी भविष्यातही सुरू ठेवावे. या कामाला आणि भविष्यातील लढाईसाठी त्यांना आमचे पाठबळ निश्चितच राहील.’
हेही वाचा:
विखे यांच्या या भेटीला राजकीय संदर्भही जोडला जाऊ लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी यांना संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरूद्ध भाजपकडून उमेदवारी देण्याची चर्चा त्यावेळी सुरू होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा संगमनेरमध्ये आली, तेव्हा इंदोरीकर त्यांच्या स्टेजवर गेले होते. कोल्हापूरच्या पुरग्रस्तांसाठी इंदोरीकरांनी एक लाख रपयांचा निधी त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यांच्या राजकारण प्रवेशाची जोरदार चर्चा त्यातून वाढत गेली. त्यानंतर स्वत: इंदोरीकरांनीच आपण राजकारणात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर काही काळात इंदोरीकरांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. पुढे जेव्हा इंदोरीकरांविरुदध ‘पीसीपीएनटी’ कायद्याचा भंग केल्याची तक्रार आली, तेव्हाही जवळपास सर्वच नेत्यांनी त्यांची सावधपणे पाठराखण केलीच होती. आता सरकारने थेट खटलाच दाखल केल्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना इंदोरीकरांची भेट घेणे अडचणीचे आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांच्या भेटीगाठी आणि पाठिंबा देण्याचा सपाटा सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times