पुणे : मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थांची गाडी पोलिसांनी बंद केल्याने जेवण न मिळाल्याने एका ग्राहकाने पोलिस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला. हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. लोहगाव परिसरात पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. पोलिस नाईक सचिन उत्तम जगदाळे (वय ३८) असे गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
जगदाळे आणि सहकाऱ्यांनी चायनीज सेंटर बंद केले. त्या वेळी आरोपी महानंदेश्वर तेथे जेवण करण्यासाठी आला होता. सेंटर बंद केल्याने त्याला जेवण मिळाले नाही. त्यामुळे महानंदेश्वर याने चिडून चायनीज सेंटरमधील चाकू घेऊन जगदाळे यांच्या गालावर वार केला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. महानंदेश्वर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.