Nagpur News : नागपूर शहरात जीवघेण्यात नायलॉन मांजा विक्रेता आणि वापर करणाऱ्यांवर पोलीस आणि महानगरपालिका अपयशी ठरली असल्याचे दिसून येत आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरा बाराखोली परिसरात नायलॉन मांजाने गळा कापलेल्या दहा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील महिन्यात या चिमुकल्याचा वाढदिवस होता, हे विशेष.

मकरसंक्रांतीतील पतंगोत्सव जवळ आल्यावर खानापूर्ती म्हणून पोलीस दल (Nagpur Police) आणि नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) कारवाईचा दिखावा करत आहे. शहरात किरकोळ आणि ठोक विक्रेते मांजा ऑर्डर करतात त्यावेळीच कारवाई केल्यास निष्पाप बालकाचा जीव गेला नसता असा आक्रोश नागरिकांनी व्यक्त केला आहे. वेद कृष्णा शाहू (वय 10, रा. मिसाळ ले-आऊट, जरीपटका) असे मृत बालकाचे नाव आहे. तो महात्मा गांधी शाळेत पाचव्या वर्गात होता. वेदच्या वडिलांचे किराणा दुकान असून, घरी मोठा भाऊ आणि आई आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदची शाळी सुटली. त्याला शाळेतून आणण्यासाठी वडील कृष्णा दुचाकीने गेले. दुचाकीवर वेद समोर बसला आणि दोघेही घराच्या दिशेने निघाले. दरम्यान अचानक समोर नायलॉन मांजा आल्याने वेदचा गळा चिरला गेला. त्याला उपचारासाठी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी कोराडी मार्गावरील एका बड्या रुग्णालयात रेफर केले. मात्र, तिथेही त्याला नकार देण्यात आल्याने धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, श्वसननलिका कापल्याने वेदची प्राणज्योत मालवली.

पुढल्या महिन्यात होता वाढदिवस 

वेदचा पुढच्याच महिन्यात 23 फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला. त्याला अंतिम निरोप देताना आई-वडिलांसह नातेवाईकांचा हुंदका आवरत नव्हता.

नायलॉन मांजाचा दुसरा बळी 

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांकडून सातत्याने नायलॉन मांजावर कारवाई सुरु आहे. तरीही पोलिसांच्या धाकाला न जुमानता मांजा विक्री सुरुच होती. विशेष म्हणजे नुकताच पतंग पकडण्याच्या नादात 11 वर्षीय बालकाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा करुण अंत झाला. ही घटना ताजीच असताना पुन्हा एक निरागस जीव मांजाचा बळी ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

news reels

शासकीय रुग्णालयात 17 जणांवर उपचार

रविवारी दिवसभरात मांजामुळे जखमी झालेल्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)मध्ये उपचार करुन घरी पाठवण्यात आलं. मांजाने कुणाचा हात तर कुणाचा चेहरा कापला गेला. गच्चीवरुन पडलेल्या आठ वर्षीय चिमुकल्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरु आहेत. उर्वरित रुग्णांना मलमपट्टी करुन घरी सोडण्यात आले. मांजामुळे पक्षीसुद्धा जखमी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याशिवाय शेकडो जखमींनी खासगी रुग्णालयातही उपचार केले असल्याची माहिती आहे.

पोलीस, मनपा विरुद्ध रोष

प्राप्त माहितीनुसार शहरातील ठोक मांजा विक्रेते पावसाळ्यादरम्यान मांजा ऑर्डर करतात. त्यानंतर त्यांच्याकडून किरकोळ विक्रेते खरेदी करतात. तसेच त्यानंतर डिसेंबर महिन्यांपासून याची विक्री जोर धरत असते. मात्र पोलीस प्रशासन आणि नागपूर महानगरपालिका फक्त जानेवारीतच कारवाई करतात. त्यामुळे ज्यांनी पूर्वीच मांजा विकला त्यावर नियंत्रण येत नाही. पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या सहाय्याने ठोक विक्रेत्यांवर नजर ठेवून मांजा शहरात दाखल होताच कारवाई केली तर असे निष्पाप बालकांचा जीव वाचला असता. तसेच शहरात या मांज्याचे वितरण होण्यापूर्वीच जप्ती करता आली असती असा आक्रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी देखील वाचा…

सत्ताधाऱ्यांमध्ये शीतयुद्ध? नागपूर जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीच्या फाईल रोखल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here