Nashik Makar Sankranti : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, मात्र दुसरीकडे मांजा न वापरण्याची शपथ घेऊनही सर्रास मांजाचा वापर करण्यात आला. यामुळे जवळपास अकरा पक्षी जखमी झाले असून चार पक्षांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) आठ-दहा दिवस पतंगोत्सव (Patang) उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी धाकड कारवाई करत अनेक ठिकाणाहून नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत केले. अनेक संशयितांना हद्दपारही केले. मात्र तरीदेखील शहरात मकरसंक्रांतीला सर्रास नायलॉन मांजाचा वापर करत पतंगबाजी करण्यात आली. ही पतंगबाजी निष्पाप पशु पक्ष्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून आले. जीवघेण्या मांजामुळे दिवसभरात 11 पक्षी जखमी झाल्याची घटना नाशिक शहरात घडली. त्यापैकी तीन कबूतर आणि एका घारीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. निर्बंधमुक्त वातावरणात संक्रांत साजरी होताना मुक्त विहार करणाऱ्या पक्षांचे गळे आणि पंख मात्र कापले गेले. 

मकरसंक्रांतीच्या उत्साहात पक्ष्यांचा नाहक बळी

नाशिक शहर आणि परिसरात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र दुसरीकडे हा उत्साह निष्पाप पशुपक्ष्यांच्या जिव्हारी लागला. सकाळपासूनच बचाव कार्य राबवून पक्षांवर उपचार करण्यात आले. जखमी पक्षांना वन विभागाच्या तात्पुरत्या उपचार केंद्र दाखल करण्यात आले. नायलॉन मांजामुळे 15 पक्षांचे पंख दिवसभरात कापले गेले. यामध्ये काही पक्षांच्या गळ्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे तीन कबूतर आणि एक घार या पक्षांचा तडफडून मृत्यू झाला. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना लक्षात घेता वनविभाग आणि इको एको फाऊंडेशनसह आपलं पर्यावरण संस्थेने पूर्वतयारी केली होती. जखमी पक्षांचे कॉल दुपारपासून येण्यास सुरुवात झाली. यानंतर वन्यजीवप्रेमी स्वयंसेवकांनी धाव घेत पक्षांना रेस्क्यू करत वन विभागाच्या जुन्या कार्यालयात सुरु असलेल्या तात्पुरत्या उपचार केंद्रात दाखल केले. तेथे दिवसभर पक्षांच्या जखमांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. मात्र यात चार पक्ष्यांचा नाहक बळी गेल्याचे निदर्शनास आले. 

2021 आणि 2022 मध्ये मकरसंक्रांतीला निर्बंधांमुळे अवघे पाच ते सहा पक्षी जखमी

दरम्यान कोरोनामुळे दोन वर्ष पतंगोत्सवावर निर्बंध असल्याने 2021 आणि 2022 मध्ये अवघे पाच ते सहा पक्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी जखमी झाले होते. तर 2020 मध्ये तब्बल 28 पक्षांना गंभीर दुखापत झाली होती. तुलनेत 2023 मध्ये नायलॉन मांजाचा साठा आणि विक्री करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी कठोर कारवाई केल्यामुळे अपघात घटनेची अपेक्षा होती. मात्र छुप्या पद्धतीने झालेली विक्री आणि घरांमध्ये असलेल्या घातक मांजामुळे पक्षी जखमी झाल्याचे दिसले. संक्रांतीच्या दिवशी नऊ वाजेपासूनच मांजामुळे पक्षी जखमी झाल्याचे फोन अग्निशामन विभागाचे पोलीस आणि वनविभागाच्या नियंत्रण कक्षात येत होते. नाशिक शहरातील इको एको फाऊंडेशनसह इतर पक्षीमित्रांनी वेळीच धाव घेतली. पक्षांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. 

news reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here