काठमांडू: नेपाळच्या पोखरामध्ये विमान अपघातात ७२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील चार तरुणांचा समावेश आहे. चौघेही नेपाळला फिरण्यासाठी गेले होते. त्यातील एकानं विमान अपघाताच्या काही सेकंदांपूर्वी लाईव्ह व्हिडीओ केला होता. विमान अपघातानंतरही व्हिडीओ सुरूच होता. त्यामुळे व्हिडीओमध्ये संपूर्ण अपघात कैद झाला. सोनू जयस्वाल असं या तरुणाचं नाव होतं.

पोखरा विमान अपघातानंतर गाझीपूरवर शोककळा पसरली आहे. चार मित्रांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गाझीपूर शोकसागरात बुडालं आहे. सोनू जयस्वालसोबतच विशाल शर्मा, अनिल राजभर आणि अभिषेक कुशवाह यांनी अपघातात जीव गमावला. चौघांचं वय २३ ते २८ वर्षांदरम्यान होतं. चौघांचे मृतदेह आज गाझीपूरला पोहोचतील. अंत्यसंस्कारांची तयारी सुरू झाली आहे.
खेळ कुणाला दैवाचा कळला! जुळे भाऊ एकमेकांपासून ९०० किमी दूर; सारख्याच प्रकारे दोघांचा शेवट
चार जीवलग मित्रांच्या निधनाचा अनेकांना धक्का बसला आहे. पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर चौघांनी व्हिडीओ चित्रित केला होता. पोखरा जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती चौघांचे मित्र असलेल्या दिलीप वर्मांनी दिली. चौघे बसनं पोखराला जाणार होते. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी अचानक प्लान बदलला आणि विमानाचं तिकीट काढलं. दुर्दैवानं त्यांचा हा निर्णय चुकला आणि हा प्रवास अखेरचा ठरला, असं वर्मा म्हणाले.

नेपाळ विमान दुर्घटनेनंतर २८ वर्षीय सोनू जयस्वालच्या व्हिडीओची सर्वाधिक चर्चा आहे. अपघाताच्या काही सेकंदांपूर्वीच सोनूनं लाईव्ह सुरू केलं. त्या लाईव्हमध्ये संपूर्ण अपघात कैद झाला. सोनूचं बियर शॉप होतं. चार भावंडांमध्ये तो सर्वात लहान होता. तो वाराणसीत वास्तव्यास होता. सोनूला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
भीषण! बाईकची कारला मागून जोरदार धडक; बाईकस्वार हवेत उडाला; विंडशील्ड फोडून आत घुसला
सोनूच्या अलावलपूरमधील घरात कोणीच नाही. घराच्या दाराला कुलूप आहे. त्याचे भाऊ पार्थिव आणण्यासाठी नेपाळला गेले आहेत. अलावलपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या विशाल शर्माचादेखील अपघातात मृत्यू झाला आहे. चार मित्रांमध्ये विशालच सर्वात लहान आहे. २३ वर्षीय विशाल शर्मा टीव्हीएस बाईकच्या एजन्सीमध्ये बाईक फायनन्सचं काम करायचा. विशालचे वडील जॉर्जियामध्ये वास्तव्यास आहेत. त्याचा लहान भाऊ शाळेत शिकतो, आई आजारी आहे. प्रशासनाकडून आईला विशालच्या मृत्यूची माहिती देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here