pune alandi conversion crime, Pune Crime : पुण्यामध्ये आळंदीत धर्मांतर केल्याचा आरोप; १४ जणांवर गुन्हा दाखल – a case has been registered against 14 people on the charge of conversion in alandi in pune
पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी आळंदी येथे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता असाच एक धर्मांतराचा दुसरा प्रकार आळंदी परिसरातील मरकळ गावात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गावात काही व्यक्ती लोकांच्या घरासमोर जाऊन “तुम्ही बायबल वाचतात का? चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला व्यवसायाला आर्थिक मदत करू”, असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा व धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत १४ जणांवर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप मधुकर वाघमारे, प्रशांत मधुकर वाघमारे (वय ३०), रोनक शैलेश शिंदे (वय १८ रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय १९ भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय २५रा. भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय ३५ रा. भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय ३८रा. भोसरी), ज्यूईल वोमन युन (वय ३६ ), ईशा भाऊसाहेब साळवे (वय १९) तीन महिला आरोपी व एक अल्पवयीन मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय २५ रा. मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात आता पुन्हा हा प्रकार समोर आल्याने नक्की या मागे काय सुरू आहे? असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. आर्थिक आमिषासाठी नागरिकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.