नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडी सावळी येथील १३ वर्षीय लक्ष्मी येडलेवार या विद्यार्थिनीला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारकडून शौर्य गाजवणाऱ्या बालकांना हा पुरस्कार दिला जातो. विद्युत तारेला चिकटलेल्या आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. लक्ष्मीला पुरस्कार जाहीर झाल्याने गावात आनंदाचं वातावरण आहे.

बिलोली तालुक्यातील लक्ष्मी येडलेवार हिचे आई वडील दोघेही शेतमजूर आहेत. घटनेच्या दिवशी आई-वडील कामाला गेले होते. २१ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी लक्ष्मी घरात अभ्यास करत बसली होती. तिचा ४ वर्षांचा भाऊ आदित्य घराच्या मागील बाजूने येत होता. मात्र बाजूच्या पत्राच्या घरात वीज प्रवाह उतरला. या घराच्या पत्रावरून एक लोखंडी तार बांधली होती. त्या तारेला आदित्यच्या हाताचा स्पर्श झाला.

शेवटच्या क्षणी प्लान बदलला; चार जीवलग मित्रांचा प्रवास अखेरचा ठरला; विमान अपघातात मृत्यू

भाऊ ओरडल्याने लक्ष्मी बाहेर आली. तारेला चिटकलेला भाऊ पाहून तिने क्षणाचाही विचार न करता त्याच्या दिशेने धावली. भावाचा शर्ट पकडून तिने भावाला बाजूला काढले. पण तिचाही तारेला स्पर्श झाला आणि ती बेशुद्ध पडली. नंतर गावकऱ्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने दोघांचेही प्राण वाचले. तिच्या या धाडसाची दखल घेत भारत सरकारने तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे.

हा पुरस्कार मिळाल्याने लक्ष्मीला आकाश ठेंगणं झालं आहे. पुरस्काराने आत्मविश्वास दुणावलेल्या लक्ष्मीला आता खूप शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर व्ह्यायची इच्छा आहे. येत्या २६ जानेवारी रोजी दिल्लीत हा पुरस्कार तिला प्रदान केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here