ठाणे : मावस बहिणीच्या घरात डल्ला मारून तब्बल ४० तोळे सोन्याची चोरी केल्याचा प्रकार डोंबिवलीमधील खोणी पलावा येथे घडला आहे. मात्र, २४ तासांच्या आत मानपाडा पोलिसांनी चप्पल आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी सिमरन पाटील हिला अटक केली आहे.

१२ जानेवारी रोजी फिर्यादी प्रिया सक्सेना ही आरोपी सिमरनसोबत एका कार्यक्रमासाठी कामोठे नवी मुंबई येथे गेले होते. १३ जानेवारी रोजी रात्रीच्या ९.१५च्या सुमारास कार्यक्रमातील गर्दीचा फायदा घेऊन मावस बहीण सिमरनने प्रियाच्या पर्समधून घराची, तिजोरीची चावी आणि एंट्री कार्ड हळूच चोरी केले. त्यानंतर आरोपी सिमरन ही प्रिया यांच्या घरी रिक्षाने पोहोचली.

सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई, दिल्लीतून काँग्रेस हायकमांडच्या सूचना

कोणालाही संशय येऊ नये यासाठी प्रिया यांचा वन पीस तिने परिधान केला. एवढचं नाही तर सीसीटीव्हीमध्ये आपला चेहरा दिसू नये यासाठी तिने आपल्या चेहऱ्याला स्कार्फ देखील बांधला. त्यानंतर चोरलेल्या चावीचा आधार घेत ती घरात शिरली आणि तिने तब्बल ४० तोळे सोने चोरी केले आणि परत त्याच कार्यक्रमात पोहचली. त्यानंतर तिने सर्व चोरी केलेले दागिने आपल्या एका डॉक्टर मित्राकडे ठेवायला दिले.

बहिण प्रियाने आपली पर्स चेक केली असता तिला चाव्या आणि कार्ड गायब झाल्याचे समजले. त्या तात्काळ आपल्या घरी आल्या तेव्हा सर्व दार वगैरे बंद असल्याचे दिसले. मात्र, मनात शंका असल्याने त्यांनी तिजोरी चेक केली तेव्हा सोने चोरी झाल्याचे समजले. त्यांनतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे आणि पथकाने तपास सुरु केला.

दरम्यान, सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासात फिर्यादीची मावस बहीण सिमरन पाटील हिची संशयास्पद वागणूक दिसली. तसेच तिने ड्रेस बदलला असल्याचे पोलिसांना लक्षात आले. मात्र, चप्पल तीच असल्याने पोलिसांची शंका वाढली आणि त्यांनी सिमरनची चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान तिने दागिने चोरल्याचे उघड झाले.

सदर गुन्ह्यात आरोपी सिमरन पाटील (वय २७, रा. कामोठे, नवी मुंबई) हिला १५ जानेवारी रोजी अटक करण्यात आलेली असून, तिच्याकडून २० लाख रुपये किमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदरचा गुन्हा २४ तासांमध्ये उघडकीस आणण्यात मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश मिळालेलं आहे.

६ हजार कोटींचं काम प्रशासकाकडून मंजूर, हा तर प्रत्येक नगरसेवकाचा अवमान, आदित्य ठाकरेंची BMC वर प्रश्नांची सरबत्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here