परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील राजश्री शाहू विद्यालयातील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या साधारण चार ते पाच मुली ४ वाजता शाळा सुटल्याने रिधोरा येथे पायी जात होत्या. यावेळी दोन दुचाकीवर आलेल्या तरुणांनी आहेरवाडी वडगाव रोडवर “पतली कमरिया हाय हाय” असं म्हणत अल्पवयीन मुलींची छेड काढली. यातील एकाने तर नववीत शिकत असणाऱ्या मुलीला “तू माझा प्रपोज एक्सेप्ट केला नाहीस तर तुला जीवे मारून टाकीन”, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर मुलींनी याबाबतची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली.
यावेळी शिक्षकांनी छेड करणाऱ्या मुलांच्या पालकांना शाळेमध्ये बोलावून घेऊन समज दिली आणि माफीनाफा लिहून घेतला. माफीनामा लिहून घेतल्याचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी ते मुलं शाळेमध्ये आले आणि वर्गात घुसून त्यांनी शिक्षकांना धक्काबुक्की केली. तसेच वर्गामध्ये असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ केली. हा प्रकार शाळेचे मुख्याध्यापक संभाजी खंदारे यांना समजल्यानंतर त्यांनी पूर्णा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यावरून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.