पीडित मुलाचे आजोबा मेहर सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाचवीत शिकणारा ओसांत घराबाहेर उभा होता. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या फुलसिंह यांच्या पिटबुल कुत्र्यानं ओसांतवर हल्ला केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याची सुटका करण्यात यश आलं, अशी तक्रार मेहर सिंह यांनी पोलिसांकडे केली आहे. ओसांत याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिटबुलचा मालक असलेल्या फुलसिंह यांनी ओसांतच्या कुटुंबीयांविरोधात आणि अन्य ग्रामस्थांविरोधात पशू क्रूरता कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलसिंह यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ओसांतचे वडील अनिल कुमार, त्यांचे चुलत बंधू नितीन, अरुण, शीशपाल, दीपू आणि चार ग्रामस्थांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.
पिटबुल कुत्रा पिंजऱ्यात होता. ओसांतनं त्याच्या दिशेनं वस्तू फेकल्यामुळे पिटबुल बाहेर आला आणि त्यानं ओसांतच्या हाताचा चावा घेतला. यानंतर कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात नेलं. कुत्र्याला दूर सोडू असं म्हणत मुलाचे कुटुंबीय पिटबुलला दूर घेऊन गेले आणि त्याची हत्या केली, असा दावा मालक फुलसिंह यांनी केला.