Bhandara News : भारतीय जनता पक्षात दोनवेळा बंडखोरी करुन कॉंग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे पक्षातून निष्कासीत झालेले माजी आमदार चरण वाघमारे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. वाघमारेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (High Court) दणका दिला आहे. माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांच्यासह त्यांच्या गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले आणि तिघांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट न दिल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे चरण वाघमारे यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्यांचा भाजप प्रवेश झाला, मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या गटातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना पुन्हा भाजपमधून (BJP) निष्कासित करण्यात आले होते.

एका महिन्यांत सुनावणी

जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आणि द्रुपदा मेहर यांची पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणारी कारवाई भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे न होण्याची याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. आता या तिघांच्या अपात्रतेची सुनावणी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या न्यायालयात होणार आहे. संदीप टाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आणि द्रुपदा मेहर यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. दरम्यान एका महिन्यात यांची सुनावणी होणार आहे. तिघेही लवकरच अपात्र होण्याची दाट शक्यता या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत या तीन क्षेत्रांसाठी लवकरच जिल्हावासीयांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार असं दिसतंय. दरम्यान याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेवर होणार असून सत्ता वाचवण्यासाठी चरण वाघमारे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित. 52 सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत 10 मे 2022 रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षपदांसाठी निवडणूक झाली होती.

जुळवा जुळव करुन जिल्हा परिषदेची सत्ता

कॉंग्रेसच्या 21 सदस्यांनी भाजपमधून निष्कासित करण्यात आलेले चरण वाघमारे यांच्या 6 सदस्यांसोबत मिळून (भाजप 5+1 अपक्ष) सत्ता स्थापन केली. यात कॉंग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष बनले आणि चरण वाघमारे गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष झाले. यावेळी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते यांचा व्हिप झुगारुन भाजपच्या 5 सदस्यांनी कॉंग्रेसला समर्थन दिले. याबाबत भाजपने तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे तक्रार करत पक्षाशी बंड करणाऱ्या पाचही जिल्हा परिषद सदस्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली.

हायकोर्टाने फेटाळली याचिका

कालांतराने चरण वाघमारे गटातील 2 सदस्य पुन्हा वाघमारे यांची साथ सोडत भाजपवासी झाले. दरम्यान चरण वाघमारे गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले, उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात अपात्रतेची सुनावणी होऊ नये, यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात ही कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट करत चरण वाघमारे गटाला जबर धक्का दिला आहे. 

news reels

जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात सुनावणी

आता संदीप टाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आणि परिषद सदस्य द्रुपदा मेहर या तिघांच्या अपात्रतेची सुनावणी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या कोर्टात होणार असून त्यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकत आहे. दरम्यान एका महिन्यात यांची सुनावणी होणार असून तिघेही लवकरच अपात्र होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत संदीप टाले यांच्या गर्रा बघेडा, उमेश पाटील यांच्या आंधळगाव आणि द्रुपदा मेहर यांच्या आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रांत लवकरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अवघ्या नऊ महिन्यांत चरण वाघमारे यांचे स्वप्न भंग झाले, असे म्हणायला काही हरकत नाही.

ही बातमी देखील वाचा…

क्रिकेटचा स्कोअर विचारायला गेलेल्या युवकांसोबत वाद ; पाच जणांना केले जख्मी

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here