Eknath Shinde: दावोसमध्ये दोन दिवसात महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी 88 हजार 420 कोटींचे करार झाले आहेत. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे, त्याशिवाय प्रत्यक्षपणे सुमारे 10 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत सध्या दावोस येथे आहेत.
आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.
अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे 20 हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प ( रोजगार १५ हजार) , ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे 1 हजार 520 कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार 2 हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे 400 कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प ( रोजगार 2 हजार) तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा 20 हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार 30 हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
#दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत, या करारांमुळे गुंतवणूकदारांचा राज्यावरचा गाढा विश्वास असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी व्यक्त केली. #Davos #WorldEconomicFourm pic.twitter.com/J4hV9S1q3x
New Reels
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2023
जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा
जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.
दावोस येथे पहिल्याच दिवशी 45 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे सामंजस्य करार झाल्यामुळे, महाराष्ट्रावर उद्योग व गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे सांगितले. या सामंजस्य करार प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदींची उपस्थिती होती.
आतापर्यंत झालेल्या विविध प्रकल्पांसमवेतच्या सामंजस्य करारांची अधिकची माहिती :
पुणे येथे 250 कोटी रुपये खर्चाचा रूखी फूडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
औरंगाबाद येथे 12 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल.
महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या 16 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यामुळे नागरी विकासाला चालना मिळणार आहे.
पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा1 हजार 650 कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे 2 हजार रोजगार निर्मिती होईल.
मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा 16 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार असून, यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील.
बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.