मुंबई: तुम्हाला सरकार पाडायचयं, जरूर पाडा. माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा. मी काही खुर्चीला फेव्हिकॉल लावून बसलेलो नाही, असं सांगतानाच हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. या सरकारचं भविष्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही, असा टोला मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेते यांना दैनिक ‘सामना’साठी दिलेल्या मुलाखतीत आघाडी सरकार पाडण्याच्या होत असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त करतानाच विरोधकांना सरकार पाडण्याचं अप्रत्यक्षपणे आव्हानच दिले. काही लोक म्हणतात ऑगस्टमध्ये सरकार पडेल. काही लोक सप्टेंबरमध्ये सरकार पडणार असल्याचं सांगत आहेत. त्यांचा इरादा असेल नसेल माहीत नाही. मी इथे बसलेलोच आहे. माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा. पाडायचं तर जरूर पाडा. त्यांना पाडापाडी करण्यातच आनंद वाटतो. काही लोकांना घडवण्यात आनंद वाटत असतो. तर काही लोकांना बिघडवण्यात आनंद वाटत असतो. त्यामुळे जरूर सरकार पाडा. हे माझं आव्हान नाही. हा माझा स्वभाव आहे. या सरकारचं भविष्य विरोधी पक्षावर अवलंबून नाही. त्यामुळे त्यांना सरकार पाडायचं तर जरूर पाडावं, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं.

महाराष्ट्रातलं सरकार लोकशाही विरोधी आहे, असं ते सांगतात. मग सरकार पाडणं लोकशाही आहे का? फोडाफोडी करून सरकार आणणं ही त्यांची लोकशाही आहे. या असल्या लोकशाहीलाच शिवसेना प्रमुखांचा विरोध होता, असं सांगतानाच राज्यात ऑपरेशन लोटस होणार की नाही, हे मला माहीत नाही. ऑपरेशन लोटस करायचं तर करा. मी कशाला भाकीत करू, असंही ते म्हणाले.

पक्षांतर केलेले किती नेते सर्वोच्चपदी गेले?
यावेळी त्यांनी आयारामगयारामांवरही टीका केली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेला कोणताही नेता सर्वोच्च पदी गेल्याचं तुम्ही कधी पाह्यलं का? पक्षांतर करणाऱ्यांना दुसऱ्या पक्षात कधीच अशी मोठी संधी मिळत नाही. उलट अशा फुटीर नेत्याचा वापरा आणि फेका असाच वापर केला जातो. कोणतंही उदाहरण तुम्ही पाहा. खरं तर पक्षांतर करणाऱ्यांसाठी हा संदेश आहे. तुमच्या पक्षात एखाद्या नेत्याने अन्याय केला म्हणून पक्षांतर करणं हा त्यावरचा पर्याय नाही. तुम्ही त्या पक्षाचा त्याग करून दुसऱ्या पक्षात जाता. त्या पक्षाची पालखी वाहता ते योग्या आहे का? शेवटी तिथेही पालखीच वाहणार ना? दुसऱ्याच्या पालखीत बसायला मिळत असेल तर जरूर जा. मी तुमच्या आड येणार नाही. पण पालखीचे भोईच व्हायचे असेल तर कशाला जाता?, असा सवाल करतानाच पक्षांतर करणारे किती नेते मोठे झाले. शेवटी कालांतराने पक्षांतर करून आलेल्यांची ठरावीक काळाने कारकिर्दही संपवली जाते, असं कटू सत्यही त्यांनी सांगितलं.

तीन चाकं तर तीन चाकं

आमचं सरकार तीन चाकांचं असल्याची टीका होते. बरं तीन चाकं तर तीन चाकं. पण ती चालताहेत ना एका दिशेने? महाराष्ट्रात तीन चाकं तर केंद्रात किती चाकं आहेत? मी एनडीएत होतो तेव्हा ३०-३५ चाकांची रेल्वे गाडीच होती. सोबत अपक्षही स्टेपनी म्हणून, अशी टीकाही त्यांनी केली.

गैरसमज दूर झाला

सरकारमध्ये राष्ट्रवादीला झुकतं माप मिळत असल्याचा काँग्रेसचा प्रेमळ गैरसमज होता. पण भेटीनंतर तो दूर झाला. पण तीव्र नाराजी वगैरे असं काही नव्हतं. तसं काँग्रेसने ठामपणे सांगितलं नाही, असं सांगतानाच लोकप्रतिनिधी निवडून येतात. त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नसतील तर लोकप्रतिनिधींनी त्यांच्या काही भावना व्यक्त केला तर त्यात वावगं असं काही नाही. शेवटी त्यांनाही मतदारांना उत्तर द्यावे लागतेच, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नेहमी चर्चा होत असल्याचंही स्पष्ट केलं.

भाजपच्या उद्देशात पोकळपणा होता

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. मी महाविकास आघाडीसोबत आलो. त्याला कारण आहे. ज्यांच्यासोबत ज्या उद्देशाने गेलो होतो, त्यांच्या उद्देशातच पोकळपणा असल्याचं मला दिसून आलं. त्यामुळे मी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट करतानाच मुख्यमंत्री होणं हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. माझ्या स्वप्नातही नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here