मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो १ सेवा बंद ठेवली जाणार आहे. सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान ही सेवा बंद ठेवली जाणार आहे. ती वेळ ऐन गर्दीची असल्याने त्याचा मुंबईतील नोकरदारांना जबर फटका बसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान बीकेसीहून या कार्यक्रमासाठी येणार आहेत. हा कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील मेट्रो ७ वरील गुंदवली स्थानकावर होणार आहे. हे स्थानक मेट्रो १ च्या पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकाच्या जवळ आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मेट्रो मार्गिकाच बंद ठेवली जाणार आहे.

मेट्रोसह ‘मुंबई वन’ची सुरुवात, मेट्रोचे ऑनलाईन तिकीट ​​काढण्यासाठी विशेष ॲप
याबाबत मेट्रो १ प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार, ‘गुरुवार, १९ जानेवारीला सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान मेट्रो सेवा प्रशासकीय कारणाने बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांनी त्यानुसार स्वत:च्या प्रवासाचे नियोजन करावे. तसदीबद्दल क्षमस्व’, असे नमूद करण्यात आले आहे.

मेट्रो १ वरून दररोज सरासरी तीन लाख प्रवासी ये-जा करतात. सायंकाळी याच दरम्यान वर्सोवा, अंधेरी, साकीनाका, असल्फा या भागातून लाखो नोकरदार मेट्रोचा वापर करतात. सेवा बंद राहणार असल्याने त्या सर्वांची गैरसोय होणार आहे. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळेच ‘सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा पूर्ण बंद करण्याऐवजी पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकावर थांबवू नये. केवळ ते एक स्थानक बंद ठेवावे’, अशी मागणी ट्विटरवर मुंबईकर प्रवासी करीत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here